। माथेरान । वार्ताहर ।
मागील दहा वर्षांपासून सफाईच्या प्रतीक्षेत असलेला माथेरानचा शारलोट तलाव यंदाही गाळातच राहिला असून तलावाची स्वच्छता आणि सफाई आता थेट पुढल्या वर्षी होणार असल्याचे बोलले जात आहे. तलावाची सफाई आणि परिसर स्वच्छतेबाबत आग्रही असलेले संतोष कदम यांनी यासाठी उपोषणदेखील केले होते. त्यांनी गावाच्या महत्वाच्या प्रश्नावर मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन याबाबत विचारणादेखील केली होती.
माथेरान या पर्यटनस्थळाचा शोध ब्रिटिशांनी लावला. त्यावेळी त्यांनी भविष्याचा विचार करीत नियोजनबद्ध पद्धतीने शारलोट तलावाची बांधणी केली. तेंव्हापासून शारलोट तलावाच्या पाण्याचा उपयोग माथेरानकरांना पिण्यासाठी होऊ लागला आहे. तिन्ही बाजूनी उतार असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून येथे तलावात येते. पावसाचे पाणी तलावात वाहून येताना माती, झाडाझुडपांची लाकडे, पर्यटकांनी टाकलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या गाळरुपात या तलावात साचून राहतात. पूर्वी प्रत्येकवर्षी या शारलोट तलावाची सफाई पावसाळ्यात केली जात असे. मात्र, मागील दहा वर्षांपासून या तलावाची सफाई झालेली नाही. यासाठी निसर्ग पर्यटन संघटना माथेरानचे अध्यक्ष संतोष कदम यांनी तलावाची सफाई व स्वच्छतेसाठी उपोषण केले होते.
संतोष कदम यांनी माथेरान पालिका मुख्याधिकारी यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी नगर पालिकामुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले की, शारलोट तलावासाठी शासनाने 4.13 कोटी रु.निधी उपलब्ध करून दिला असून या निधीतून बंधार्याची सुरक्षितता तलावाची सफाई, स्वच्छता तसेच परिसराचे सुशोभीकरण याकरिता निधी वापरला जाणार असून याबाबत सनियंत्रण समितीसोबत चर्चा करून त्यांची यासाठी परवानगी घेऊन कामाला सुरुवात होईल. यामुळे आता शारलोट तलावाची सफाई ही पुढल्यावर्षी होणार हे निश्चित झाले असून यंदाही तलाव गाळमुक्त होणार नसल्याने माथेरान पर्यटनस्थळाला ऐन पर्यटन हंगामात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.







