। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील बोर्वे येथील रहिवासी पेण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कनिष्ठ सहाय्यक पदावर काम करीत असलेले शशिकांत गावंड नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त पेणचे नायब तहसीलदार प्रवीण परदेशी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य विद्या पाटील, एस.जे. साळुंखे, पी.एस. फड, एस.आर. पवार, दिनेश मगर, शोभा गावंड, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ऋणाली मोकल, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पंच मंडळाचे सदस्य के.जी. म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे आदींसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक, कर्मचारी गावंड यांचे कुटुंबिय उपस्थित होते. शशिकांत गावंड यांना संस्थेने दिलेली जबाबदारी पार पाडत असत. गावंड हे संघर्ष करुन या पदावर पोहोचले आहेत. त्यांनी नागोठणे, पेण येथेदेखील उत्तम काम केले आहे. संस्थेतील क्रीडा कार्यक्रमात गावंड यांचे महत्त्वाचे योगदान असायचे, असे यावेळी संस्थेच्या प्राचार्या विद्या पाटील यांनी सांगितले. माझ्या सेवा काळात येथील प्राचार्या, शिक्षक, कर्मचारी यांनी मला सहकार्य केले असून, त्यांच्या सहकार्यामुळे मी येथे उत्तम काम करु शकलो, असे यावेळी शशिकांत गावंड यांनी सांगितले.