टी-20मधून शॉन विल्यम्सची निवृत्ती

| ढाका । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक 2024 चा थरार 1 जूनपासून रंगणार आहे. या क्रिकेटच्या महासंग्रामापूर्वी, झिम्बाब्वे क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण वरिष्ठ अष्टपैलू शॉन विल्यम्सने टी-20 प्रकारामधून अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्‍चर्यचकित केले आहे. 37 वर्षीय विल्यम्सने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतील 5व्या सामन्यानंतर हा निर्णय घेतला. ज्याची माहिती ही झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने दिली. झिम्बाब्वे क्रिकेटने सांगितले की, सीन विल्यम्सने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सामना संपल्यानंतर त्याने आपला निर्णय आपल्या सहकार्‍यांना सांगितला. शॉन विल्यम्सने टी-20 मध्ये असा विक्रम केला आहे, जो टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि वेस्ट इंडिजचा स्टार सलामीवीर ख्रिस गेल यांनाही आतापर्यंत करता आलेला नाही. झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू शॉन विल्यम्स हा सर्वात दीर्घ कालावधीसाठी म्हणजेच 17 वर्षे 166 दिवस टी-20 आंतरराष्ट्रीय खेळणारा जगातील दुसरा क्रिकेटपटू आहे. या बाबतीत बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे. ज्याची कारकीर्द दीर्घकाळ चालू राहील.

सीन विल्यम्सने 28 नोव्हेंबर 2006 रोजी बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 81 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 80 डावांमध्ये 23.48 च्या सरासरीने आणि 126.38 च्या स्ट्राईक रेटने 1691 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 11 अर्धशतके झळकावली. टी-20 क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 66 आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 73 डावात 48 यश मिळवले आहे. या काळात त्यांची सरासरी 28.62 होती. 3/15 हे त्याचे गोलंदाजीतील सर्वोत्तम आकडे आहेत.

Exit mobile version