शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग

पद्मभूषण डॉ.वसंतदादा पाटील कॉलेजचा विजय

| पुणे | वृत्तसंस्था |

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्यावतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धेत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने फुटबॉलमध्ये मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ एन्वोर्मेन्ट डिझाईनवर मात केली. वानवडी येथील एस. आर. पी. एफ. मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील मुलांच्या गटातील फुटबॉल स्पर्धेत पाटील कॉलेजने मराठवाडा संघावर 2-1 ने मात केली. यात पाटील कॉलेजकडून उदुराज कदम (8 मि.) आणि ओम तौने ( 15 मि.) यांनी गोल केले. तर मराठवाडाकडून नयन धाकटे ( 20 मि.) एकमेव गोल केला.

ब्रिक स्कूलने डॉ. वसंतदादा पाटील कॉलेजवर 1-0ने मात केली. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. मात्र, लढतीच्या नवव्या मिनिटाला आयूष कपाडेने गोल करून ब्रिक स्कूलला आघाडी मिळवून दिली. यानंतर डॉ. वसंतदादा पाटील कॉलेजने बरोबरीसाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. अखेर आयूषने केलेला गोल निर्णायक ठरला.

दुसऱ्या लढतीत कोल्हापूरच्या डी. वाय. पी. सी. ई. टी संघाने आकुर्डीच्या पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाचा 2-1ने पराभव केला. डी. वाय. पी. सी. ई. टी संघाकडून देवाशिष सरनोबत (4 मि.) आणि आदित्य गवळी (13 मि.) यांनी गोल केला. पाटील कॉलेजकडून एकमेव गोल दिशांत राऊतने (6 मि.) केला. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि आयोजन स्कूल ऑफ डिझाईन यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली. सिंहगड कॉलेजकडून शुभम बडेने (38 मि.), तर आयोजन स्कूलकडून सिद्धार्थ नानावटीने (28 मि.) गोल केला. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि भारती विद्यापीठ यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.

मुलींच्या गटात दिक्षिता झोपेच्या (1 मि.) एकमेव गोलच्या जोरावर आकुर्डीच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर 1-0ने मात केली. आयोजन स्कूल ऑफ डिझाईन आणि श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.

Exit mobile version