अटक वॉरंट जारी; 18 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश
। ढाका । वृत्तसंस्था ।
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बांगलादेशमधील न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने 18 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाचे मुख्य अभियोक्ता मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी ही माहिती दिली. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्याविरुद्ध मानवाधिकार उल्लंघनाशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. विद्यार्थी आंदोलनात प्राण गमावलेल्या अनेक विद्यार्थ्यांची हत्या केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी आता शेख हसीना यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे.
बांगलादेशात शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतालाही राजनैतिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेख हसीना यांच्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांवरही परिणाम होऊ शकतो, असे मानले जात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 2013 मध्ये प्रत्यार्पण करार झाला होता. यामुळे आता बांगलादेशमधील सरकारने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करु शकते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार, सीमावाद, दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणार्या गुन्हेगारांना दोन्ही देशांच्या विनंतीनुसार परत पाठवले जाईल, असा त्यावेळी करार झाला होता. शेख हसीना यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हाही दाखल आहे.
या वर्षी जुलै महिन्यात बांगलादेशात आरक्षणाविरोधात देशभरात विद्यार्थी आंदोलन झाले होते. महिनाभर चाललेल्या या आंदोलनात चारशेहून अधिक जणांना जीव गमवावा लागला. यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन ढाक्याला गेले. 5 ऑगस्ट रोजी सुरक्षेच्या कारणास्तव शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरने भारतात आल्या. तेव्हापासून शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. यानंतर बांगलादेशात सत्तांत्तर झाले.