खड्डेमय रस्त्याविरोधात शेकापतर्फे रास्ता रोको
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
खड्डेमय रस्त्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाने लढा सुरु केला आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.7) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पेझारी तपासणी नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे शेकापचे लाल वादळ अलिबाग – पेण मार्गावर धडकणार आहे.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, ॲड. निलम हजारे, वृषाली ठोसर, आदी वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
अलिबाग – पेण मार्गावरील पेझारी चेक पोस्ट येथे कार्यकर्ते जमणार आहेत. सकाळी नऊ वाजता रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात होणार आहे. ग्रामीण भागासह अलिबाग-पेण, अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरूड मार्गावरील रस्त्याचे खड्डे बूजविण्याबाबात शेकापतर्फे अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्याची ठोस अंमलबजावणी होताना दिसून आली आही. खड्डेमय रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीत शंभरहून अधिक अपघात झाले आहेत. यामध्ये 363 जणांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यातील काहींचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघात रोखण्यासाठी शेकापने रास्ता रोको आंदोलन करण्याची भुमिका घेतली असून, गेल्या दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. खड्डे बुजविण्याबरोबरच कामाचा योग्य दर्जा याची लेखी हमी देणे या मागणीसाठी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शेकाप तर्फे केली जाणार आहे.







