शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी शेकाप कटिबद्ध- चित्रलेखा पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

युवा ग्रामसुधार समिती धाकटे शहापूर आणि शेतकरी संघर्ष समिती पेझारी तसेच पाच गावांतील शेतकरी व भूमीपुत्रांनी शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्‍या शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची शुक्रवारी (दि. 19) भेट घेतली. दरम्यान, शेकाप सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा राहून न्याय मिळवून देईल, असा विश्‍वास चित्रलेखा पाटील यांनी दिला.

दरम्यान, शासनामार्फत भूसंपादनाची प्रक्रिया राबवताना शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या शेतीच्या बाजारमूल्याची 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे रेडीरेकनरच्या दरापेक्षा चार पटीने भाव विकासकाने अर्थात संपादन संस्थेने दिला पाहिजे, एमआयडीसीने पूर्व संपादित अधिग्रहण केलेली 2007 साली टाटा विद्युत प्रकल्पासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित झाल्या, त्यांना तत्कालीन लागू झालेल्या पुनर्वसन कायद्याप्रमाणे 17 वर्षांची नुकसानभरपाई मिळावी, प्रकल्पबाधित कुटुंबातील शैक्षणिक पात्रतेनुसार एका व्यक्तीस सातबाराप्रमाणे वारसा हक्काने कायमस्वरूपी नोकरी प्रकल्पात मिळावी, प्रकल्पबाधित असल्याचा दाखला प्रत्येक सातबाराधारकास मिळावा, प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना उच्चतम प्रमाणात जिल्ह्यातील विमानतळासाठी विकसित भूखंड दिला आहे, त्याप्रमाणे विकसित भूखंड मिळवा, प्रकल्पबाधित व्यक्ती, समूह किंवा सहकारी संस्था प्रकल्पात कंत्राटी व कामासंदर्भात प्राधान्य मिळावे, शेतकर्‍यांना कृषी मजुरी मिळावी याकरिता युवा ग्रामसुधार समिती धाकटे शहापूर तसेच पाच गावातील शेतकरी व भूमीपुत्रांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना पत्रव्यवहार यापूर्वी केला होता, याबाबतची माहिती उपस्थितांनी चित्रलेखा पाटील यांना दिली.

न्याय्य हक्कासाठी शेतकरी संघर्ष समिती पेझारी व ग्राम सुधार समिती धाकटे शहापूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदरील केस बोर्डावर असून, पुढच्या आठवड्यात सुनावणीसाठी आहे. सदरील याचिकेत वरील सर्व मागण्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे, तसेच न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश व निवृत्त सनदी अधिकारी द्विस्तरीय लवाद नेमून वरील प्रश्‍नी त्वरित तोडगा काढावा, अशीही मागणी करण्यात आली आहे, तसेच लवकरच जिल्हाधिकारी यांच्या दालनात शेतकर्‍यांची संयुक्त बैठक आयोजित केली जाणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांना सांगण्यात आले.

दुसर्‍या सत्राचे भूसंपादन करताना योग्य स्वरूपाचा भाव देण्यात यावा, सर्वे नंबर 20 ते 200 या जागेत टाटा पॉवर प्रकल्प उभारण्यात येणार होता, याकरिता कवडीमोल भावाने शेतकर्‍यांच्या जमिनी विकत घेतल्या होत्या, पण तो प्रकल्प उभा राहिला नाही. शेतकर्‍यांना न्याय मिळवून शहापूर येथील रेडीरेकनर दर प्रतिएकर 41,20,000/- या भावाच्या चौपट 1,64,80,000/- एवढा भाव भूमीसंपादन कायदा 2013 प्रमाणे शेतकर्‍यांच्या मागणीनुसार सर्व बाधित शेतकर्‍यांना मिळालाच पाहिजे, यासाठी आम्ही लढा देणार आहोत, असा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला.

याप्रसंगी उपस्थित मान्यवर माजी पंचायत समिती सदस्य सुधीर थळे, गावकीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, अ‍ॅड. कुंदन पाटील, शहापूर ग्रामपंचायत माजी सरपंच राजेंद्र पाटील, अजित पाटील, शेतकरी संघर्ष समिती पेझारी सचिव अनिल पाटील, सुहास पाटील, उल्हास पाटील, नंदकुमार पाटील, नरेंद्र मोकल, ग्रा.पं. सदस्य अनिल म्हात्रे, मितेश पाटील, ज्येष्ठ ग्रामस्थांसह जवळपास 55 शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षाचा जिल्ह्यातील प्रकल्पांना विरोध याआधीसुद्धा नव्हता आणि भविष्यातसुद्धा नसेल. पण, प्रकल्पबाधित आणि स्थानिक भूमीपुत्रांना नोकर्‍या आणि विकसित भूखंड मिळालाच पाहिजेत, हा आमचा अट्टाहास असेल. आमचा पक्ष शेतकर्‍यांच्या, स्थानिकांच्या पाठीशी सदैव उभा राहील आणि न्याय मिळवून देईल.

चित्रलेखा पाटील,
शेकाप महिला आघाडी प्रमुख

Exit mobile version