| नवीन पनवेल | वार्ताहर |
महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी रस्त्यांची व इतर विकास कामे सुरू आहेत. मात्र, यातील काही कामे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार शेतकरी कामगार पक्षाने पालिकेकडे केली.
पनवेल परिसरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेतर्फे कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणची कामे संथ गतीने सुरू आहेत. तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचे शेकापचे म्हणणे आहे. कामोठे, कळंबोली, खारघर या ठिकाणची सिमेंट काँक्रिट करण्याची कामे रात्रीत उरकून घेतली जात आहेत. त्याला शेकापचा आक्षेप आहे. तसेच ही कामे सुरू असताना पनवेल पालिकेचे अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप देखील शेकापच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. जनतेचा पैसा असा वाऱ्यावर जाऊ देणार नसल्याचे शेकापने सांगितले. यातील काही निकृष्ट कामे स्वतः थांबवली असल्याचे माजी नगरसेवक प्रमोद भगत यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि संगनमताने हा सर्व प्रकार सुरू असल्याचा आरोप शेकापच्या माजी नगरसेवकांनी केला. विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामे जनतेच्या माथी मारली जात आहेत. याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर आगामी भूमिका वेगळी असेल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, शेकाप पनवेल महानगरपालिका महिला जिल्हा सहचिटणीस तेजस्विनी घरत, पालिका माजी नगरसेवक प्रमोद भगत, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, माजी नगरसेवक गोपाल भगत, शेकापचे कामोठे कार्याध्यक्ष गौरव पौडवाल, मधुकर सुरते, रमेश गोरे, बंटी पाटील, नंदकिशोर भोईर, समाजसेवक ज्ञानेश्वर गायकर उपस्थित होते.