मतांचे राजकारण शेकाप कदापि करीत नाही- आ. जयंत पाटील

माणगाव | प्रतिनिधी |
मतांचे राजकारण शेकाप कधी करीत नाही. लोकांना सेवा देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आम्ही विकासकामे करताना नारळ फोडणे, पाट्या लावणे हे बर्‍याचदा टाळतो.आपली कामाची पाटी लोकांच्या हृदयात असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी माणगाव तालुक्यातील रानवडे कोंड येथे शनिवारी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
मोर्बा जिल्हा परिषद गटातील निवाची नळेफोडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा भूमिपूजन, पळसप येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, डोंगरोली येथे मुख्य रस्ता डांबरीकरण भूमिपूजन, मोर्बा येथे संरक्षण भिंत बांधणे कामाचा भूमिपूजन,मोर्बा येथील सभामंडप बांधकामाचे उदघाटन आदी विकासकामांचा शुभारंभ आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर रानवडे कोंड येथे पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार जयंतभाई पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी आमदार पंडित पाटील, जेष्ठ नेते नानासाहेब सावंत,अस्लम राऊत, राजिप सदस्या आरती मोरे, तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे, माजी समाजकल्याण सभापती अशोक गायकवाड, कृउबा समिती सभापती संजय पंदेरे, चांदोर सरपंच चांदोरकर,म्हसळा तालुका शेकाप चिटणीस संतोष पाटील, निजाम फोपळूणकर,विलास गोठल,अमोल मोहिते आदींसह मतदार संघातील शेकाप कार्यकर्ते, महिला, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले रानवडे गावात मी दुसर्‍यांदा आलो आहे.10 वर्षांपूर्वी या गावासाठी पिण्याच्या पाण्याची योजना आपण आणली होती. त्यावेळी पंडित पाटील रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते तर अस्लम राऊत या मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य होते. या गावाने आरती मोरे यांना मते दिली नाही.पण त्यांनी गावातील विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. मतांचे राजकारण शेकाप कधी करीत नाही.लोकांना सेवा देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. श्रीवर्धन मतदार संघात अगदी म्हसळ्यापासून आज ज्या ज्या ठिकाणी आपल्या सभा झाल्या त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. श्रीवर्धन मतदार संघात परिवर्तन होत आहे,असे त्यांनी निदर्शनास आणले.

आपण ज्यांना मागील निवडणुकीत मदत केली ते लोक आपल्याला विसरलेले आहेत.शेकाप दिलेला शब्द पाळतो. म्हणूनच शेकापचे नाव रायगड जिल्ह्यात आहे.
आ.जयंत पाटील

ते पुढे म्हणाले की, लोकांची प्रश्‍ने पोटतिडकीने आपण विधी मंडळात मांडत असतो.विधानसभा,विधानपरिषद ही एक ताकद आहे.चांदोरे ग्रामपंचायत हद्दीत कोट्यावधी रुपयांची विकासकामे शेकापने केली आहेत.शेकाप नारळ फोडणे,पाट्या लावण्यापेक्षा त्या गावातील विकासकामे झाली पाहिजेत यासाठी प्रयत्नशील राहतो.असे त्यांनी सांगितले.
माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना या मतदार संघाला आरती मोरेंच्या रूपाने कर्तबगार जिल्हा परिषद सदस्या मिळाल्या.विकासकामांसाठी पैसे कुठून कसे आणायचे हे रमेश मोरे यांच्याकडून शिकावे असे सांगितले.
प्रास्ताविकात तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी या शेकापमार्फत मतदार संघात गेल्या पाच वर्षात 8 कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आपण यशस्वी झालो असून आज मतदार संघात दीड कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करीत असल्याचे सांगितले.

Exit mobile version