शेकाप खांदावासियांच्या पाठीशी ठाम

प्रीतम जनार्दन म्हात्रे यांचे आश्‍वासन
अन्यायकारक करवाढीवर आवाज उठविणार

| पनवेल | प्रतिनिधी |
कोरोना काळ असतानासुद्धा पनवेल महानगरपालिकेने करांमध्ये सवलत देण्याचे सोडून अन्यायकारकरित्या वाढ केलेली आहे. याविरुद्ध रविवारी खांदा कॉलनी रहिवासियांनी एकत्र येत निषेध नोंदवला. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅक्स न भरण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केले. जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅक्स रद्द होत नाही, तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष शांत बसणार नाही, शेकाप नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे आहे, असे आश्‍वासन प्रीतम म्हात्रे यांनी दिले.

पनवेल महानगरपालिकेने आतापर्यंत फक्त कचराच सिडकोकडून हस्तांतरित करून घेतलेला आहे आणि त्यातही मोठा भ्रष्टाचार कचरा उचलण्याच्या टेंडरमध्ये केलेला आहे. असे असतानासुद्धा महानगरपालिका अन्यायकारकरित्या टॅक्स लावत आहे, असे शेकाप नेते महादेव वाघमारे यांनी लोकांच्या निदर्शनास आणले. आता तरी सत्ताधार्‍यांनी जागे होऊन सर्वसामान्य नागरिकांवर लावलेला अन्यायकारक मालमत्ता कर रद्द करून, दुहेरी कराच्या विरुद्ध योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खांदा कॉलनी येथील रहिवासियांच्या बैठकीत मा. उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी व्यक्त केली. पनवेल महानगरपालिकेने सर्वप्रथम खांदा कॉलनीकरांना योग्य त्या आरोग्य सेवा पुरवाव्यात जेणेकरून कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत, त्यासाठी प्राधान्य द्यावे, त्यानंतर इतर सुविधा पुरवाव्यात, त्यानंतरच कर लावावा, अशी अपेक्षा शेकाप नेते अनिल बंडगर यांनी व्यक्त केली.यावेळी नगरसेविका सारिका भगत, माजी नगरसेवक शिवाजी थोरवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विकास मंडळाचे अध्यक्ष श्याम लगाडे, सचिव महेंद्र कांबळे, शेकाप युवा नेते अतुल भगत, मंगेश अपराज, शेकडो नागरिक आणि सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version