विरोधकांचा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिन्ह वाटप प्रक्रिया बुधवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात राबविण्यात आली. मात्र, यावर भाजपच्या एका व्यक्तीने शेकापला खटारा चिन्ह वाटप करण्यावर आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. ॲड. सचिन जोशी यांनी केलेले युक्तीवाद आणि दाखविलेल्या पुराव्यानुसार शेकापला खटारा चिन्ह निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले असल्याचे ॲड. जोशी यांनी सांगितले.
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचे उमेदवार उभे राहिले आहेत. थेट नगराध्यक्षपदासाठी अक्षया प्रशांत नाईक, नगरसेवकपदासाठी प्रभाग एकमधून संतोष मधूकर गुरव, संध्या शैलेश पालवणकर. प्रभाग दोनमधून सुषमा नित्यानंद पाटील. प्रभाग तीनमधून साक्षी गौतम पाटील, आनंद अशोक पाटील, प्रभाग चारमधून रेश्मा मनोहर थळे, महेश वसंत शिंदे. प्रभाग पाचमधून निवेदिता राजेंद्र वाघमारे, समिर मधूकर ठाकूर. प्रभाग सहामधून ऋषीकेश रमेश माळी, अश्विनी ठोसर. प्रभाग सातमधून ॲड. मानसी संतोष म्हात्रे, अभय म्हामुणकर. प्रभाग आठमधून ॲड. निलम किशोर हजारे, अनिल चोपडा. प्रभाग नऊमधून योजना प्रदीप पाटील, सागर शिवनाथ भगत. प्रभाग दहामधून शैला शेषनाथ भगत, वृषाली महेश भगत हे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
अर्ज माघार प्रक्रियेनंतर बुधवारी (दि.26) चिन्ह वाटप प्रक्रिया प्रशासनाकडून राबविण्यात आली. दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाला खटारा चिन्ह देऊ नये याबाबत भाजपच्या पल्लवी जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना अर्ज केला होता. खटारा चिन्ह वाटपाबाबत त्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यांचा हा आक्षेप फेटाळण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आक्षेप ग्राह्य धरला नाही. शासनाचे पाच मे 2025 रोजी परिपत्रक आले होते. यानंतर चिन्ह वाटपाबाबत सुधारित परित्रक 25 नोव्हेंबरला काढण्यात आले. या परिपत्रकामध्ये चिन्ह वाटप मागणीप्रमाणे द्या, असे नमूद करण्यात आले. त्यामुळे जोशी यांचा आक्षेप ग्राह्य धरला नाही. याबाबत ॲड. सचिन जोशी यांनी केलेला युक्तीवाद व सादर केलेल्या पुराव्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शेकापला खटारा चिन्ह वाटप केले असल्याची माहिती ॲड. सचिन जोशी यांनी दिली.
खटारा, हाताचा पंजा चिन्ह
अलिबाग नगरपालिकेचे मतदान दोन डिसेंबरला होणार असून, मतमोजणी तीन डिसेंबरला आहे. बुधवारी दुपारीपर्यंत उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. शेकाप उमेदवारांसाठी ‘खटारा' आणि काँग्रेस उमेदवारांसाठी ‘हाताचा पंजा' चिन्ह मिळाले आहे. महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेस उमेदवारांना खटारा, हाताचा पंचा चिन्ह मिळाले असल्याने आनंद व्यक्त करण्यात आला.
शेतकरी कामगार पक्षाचे खटारा चिन्ह आहे. हे चिन्ह निवडणुकीसाठी मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. हे चिन्ह सर्वांचे परिचित आहे.
विजय गिदी,
शेकाप तालुका चिटणीस, मुरूड






