अलिबागमध्ये पीएनपी नाट्यगृह नूतनीकरणाचा शुभारंभ
| अलिबाग | प्रतिनिधी |
माझे संपूर्ण कुटुंबिय हे शेतकरी कामगार पक्षाचे होते. आई, वडिलांसह भाऊ वसंतराव पवार यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अनेक लढे उभारले. शेकापचा झेंडा कायम फडकविला. त्यावेळी मी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत होतो. शेकापचे दिग्गज नेते क्रांतीसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, भाई दाजीबा देसाई, स्व. दि.बा. पाटील, स्व. गणपतराव देशमुख, स्व. डॉ. एन.डी. पाटील यांच्यासमवेत स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील, स्व. दत्ता पाटील, स्व. मीनाक्षी पाटील यांच्यासोबत कौटुंबिक नाते होते. शेकापचे तत्कालिन दिग्गज नेत्यांच्या अनेक सभा घरी झाल्या. त्यावेळी शेकापची पार्श्वभूमी, संघर्षमय इतिहासाचा मी साक्षीदार आहे. तेव्हापासून पाटील कुटुंबियांसमवेत जिव्हाळ्याचे नाते आहे. आजही ते आम्ही दोन्ही कुटुंबियांनी जपले असल्याचे देशाचे माजी संरक्षण मंत्री तथा विद्यमान खासदार, राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांनी सांगितले. शेकापचे नेते जयंत पाटील 70 वर्षांचे असले, तरी त्यांचा उत्साह 35 वर्षांच्या युवकाप्रमाणे आहे. माझा राज्याच्या वेगवेगळ्या सहकारी संस्थाशी संबंध आला आहे. कोकणात सहकारी बँकेचे जाळे मजबूत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये सहकार गतिमान करण्यामध्ये रायगडचा मोठा वाटा आहे, असे कौतुकोद्गार पवार यांनी काढले.
मा. आमदार जयंत पाटील यांचा सोमवारी (दि.7) अभिष्टचिंतन सोहळा तसेच पीएनपी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा जयंतभाई पाटील अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, खासदार निलेश लंके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, रघुजीराजे आंग्रे, आ. बाबासाहेब देशमुख, आ. नारायण पाटील, प्रताप ढाकणे, माजी आ. बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप खजिनदार अतुल म्हात्रे, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, राजेंद्र कोरडे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, जिल्हा, तालुका चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, वेगवेगळ्या आघाडींचे पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, सदस्य, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रांतील पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शरदचंद्र पवार म्हणाले की, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यशस्वी बँक आहे. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून जयंत पाटील यांनी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्याचे काम चांगल्या पद्धतीने केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेला रायगड जिल्हा आहे. महाड येथील चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडवणारा हा परिसर आहे. सरखेल कान्होजी यांनी इंग्रज, पोर्तुगीजांचा पराभव करून खांदेरी किल्ला सुरक्षित ठेवणारा हा परिसर आहे. अलिबाग, चौल, नागाव, आक्षी, रेवदंडा हा परिसर ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध असा हा भाग आहे. शौर्य गाजवणारा जिल्हा आहे. सुसंस्कृत, समृद्ध असा उद्याचा हा परिसर आहे, असे शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये अलिबागसह रायगड हा एक वेगळा जिल्हा आहे. राजकारणात रायगडची एक वेगळी भूमिका कायमच राहिली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी रायगडच्या राजकारणात एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पक्ष मजबूत करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका त्यांची कायमच राहिली आहे. सार्वजनिक जीवनात काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षात काम केले असले, तरी शेकापचे जयंत पाटील कुटुंबियांसोबत वैयक्तिक जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात शेकापसोबत जोडला गेलेलो आहे. पाटील कुटुंबियांशी एक वेगळा ऋणानुबंध आहे. जयंत पाटील आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहिले आहेत. सत्ता असो अथवा नसो, कष्टकरी वर्गाच्या हिताची जपणूक करण्याचे काम जयंत पाटील यांनी कायमच केले, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.
महाराष्ट्रात बदल होणार
शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार असणारा हा महाराष्ट्र आहे. परंतु, महाराष्ट्रात सध्याची राजकीय परिस्थिती भयावह आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांबाबत सत्ताधाऱ्यांना किती आस्था आहे, हे दिसून येत आहे. राज्यात खऱ्या अर्थाने शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना शक्ती द्यायची असेल, तर सर्व प्रागतिक पक्षातील विचाराने एकत्र येणे गरजेचे आहे. सर्व पक्ष एकत्र येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात महाराष्ट्रात बदल नक्की होणार आहे. शेतकरी, कामगार व कष्टकरांच्या हिताची जपणूक करणारे सरकार आणण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागा. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबागची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.











