खड्डेमुक्तीसाठी शेकाप आक्रमक

गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बुजविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागसह रायगड जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांसह महामार्गावरील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, अजूनपर्यंत खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकापने खड्डेमुक्तीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित विभागाला शेकापच्या वतीने निवेदन देऊन गणेशोत्सोपूर्वी खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप तालुका अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, सतीश प्रधान, अनिल चोपडा, संजना किर, विक्रांत वार्डे, नागेश्वरी हेमाडे, नंदू गावडे, अशोक प्रधान, निलेश खोत, विकास घरत, निनाद रसाळ यांसह शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणरायाचे आगमन येत्या 27 ऑगस्टपासून घरोघरी होणार आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईसह वेगवेगळ्या भागातून चाकरमानी अलिबागसह जिल्ह्यात येणार आहेत. गणरायाचे आगमन काही दिवसांवर असताना अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचारी हैराण आहेत. शासन मात्र कानावर हात ठेवून बसल्याचे चित्र आहे. अखेर जनतेच्या भावनांचा विचार करून शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरला. जिल्हा परिषद बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गुरुवारी (दि.14) धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी भवन ते थेट सरकारी कार्यालये गाठली. मुख्य रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरावेत, गणेशोत्सवाआधी दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली. गणेशोत्सवाआधी रस्ते न दुरुस्त झाल्यास यापेक्षा मोठे आणि उग्र आंदोलन करण्यात येईल, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, अशा इशारा दिला.

Exit mobile version