तालुका चिटणीस सुरेश घरत यांची वन अधिकारी यांच्याकडे तक्रार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सहाण बायपास परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची तोड झाली आहे. वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या वृक्षतोडीबाबत शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाले आहे. शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी उपवनसंरक्षक राहूल पाटील यांची भेट घेऊन वृक्षतोडी विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सुरेश घरत यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भुषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अलिबाग तालुक्यातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. सहाण बायपास परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे काही कंपन्यांकडून तोडण्याचे काम करण्यात आले आहे. श्री. नानासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेले पर्यावरण पूरक कार्य उध्वस्त करण्याचा घाट घालण्यात आला आहे. वृक्ष तोडीची अधिकृत परवानगी असल्याचे भासविले जात आहे. विकासाच्या नावाखाली ही वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. तोडण्यात आलेल्या वृक्षांचे पूनर्वसन करण्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे. याप्रकरणी दोषी असणाऱ्यांविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.








