पिकांच्या पंचनाम्यासाठी शेकाप आक्रमक

नुकसान भरपाईची तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरेंची मागणी
| माणगाव । वार्ताहर ।
परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाला आलेला घास काढून घेतला असून माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील या गरीब शेतकर्‍यांना परतीच्या पावसामुळे झालेल्या भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे शासनाने करून तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे कांबळे यांना निवेदनातून केली आहे. यावेळी तालुका शेकापचे ज्येेष्ठ नेते अस्लम राऊत, विलास मोरे, नथुराम अडित, निजाम फोफळूनकर, दिनेश गुगळे, संतोष सकपाळ, नितीन वाघमारे, योगेश मोरे, स्वप्नील दासवते, राकेश पातेरे, बळीराम खडतर, आदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यावेळी तालुका चिटणीस रमेश मोरे व त्यांचे सहकारी यांनी तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांचा शेताच्या बांधावर जावून नुकसान झालेल्या भात पिकाची पाहणी केली.

नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यासह माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात तयार झालेले भात आडवे होऊन तसेच लावलेल्या मळण्या यांचे नुकसान झाले.माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना मागील दोन वर्षांपासून कोरोना,चक्री वादळ,तौकते वादळ,अतिवृष्टी अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अवकाळी वादळी पावसामुळे कापनी केलेले भात तसेच शेतात उभे असलेले भातपीक पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकर्‍यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या भातपिकाचे तातडीने महसूल खात्याने पंचनामा करून त्यांना शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळून दयावी अशी मागणी तालुका शेकापने निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version