। महाड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी विधान परिषद आमदार जयंत पाटील यांनी नुकतीच महाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन समितीच्या संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या.
आपल्या पूर्वनियोजित आरडीसी बँकेच्या कामासाठी महाड तालुक्यामध्ये आले असताना त्यांनी अगत्यपूर्वक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये भेट देऊन समितीकडून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. तसेच समितीच्या भवितव्यासाठी आपण बांधील असल्याचे स्पष्ट करतानाच सर्व कार्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी जयंत पाटील यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर सपकाळ, उपसभापती वैभव चांदे, आरडीसीसी बँकेचे संचालक हनुमंत जगताप व राजू मोरे यांनी स्वागत केले. यावेळी आरडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, अस्लम राऊत, बाजार समितीच्या वतीने संतोष गायकवाड व कर्मचारी वर्ग हे देखील उपस्थित होते. महाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन वास्तूची निर्मिती झाल्यानंतर आरडीसीसी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांची ही सदिच्छा भेट असल्याने महाडमधील सहकार क्षेत्रात कार्य करणार्या कार्यकर्त्यांना मोठे पाठबळ मिळेल, असा विश्वास बाजार समितीचे सभापती श्रीधर सपकाळ यांनी व्यक्त केला.
शेकाप नेते जयंत पाटील यांची महाड कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट
