शेकापचे आ.जयंत पाटील मुरुडच्या दौर्‍यावर

। मुरूड/जंजिरा । वार्ताहर ।
शेकापचे आ.जयंत पाटील हे गुरुवारी (दि.27) मुरुड तालुक्याच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्यांच्या हस्ते आमदार निधीतून आणि वाणदे ग्रामस्थ मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने वाणदे गावी बांधण्यात आलेले श्री हनुमान मंदिर आणि सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

माजी आ.पंडित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमास जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या निमित्ताने गुरुवारी सकाळी 8 वाजता मारुती मुर्तीची मिरवणूक, सकाळी 9 वाजता प्राणप्रतिष्ठा, दुपारी मंदिराचा उद्घाटन समारंभ आणि मान्यवरांचा सत्कार, सायंकाळी आमंत्रित भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. 28 एप्रिल रोजी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी हरिपाठ किल्ले रोहा, रात्री 9 वाजता हभप डॉ सुहास महाराज फडतरे, सातारा यांचे कीर्तन असे तीन दिवस कार्यक्रम आहेत. या सर्व कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील, गणपत पाटील, रामचंद्र दिवेकर, नंदकुमार ठाकूर, अनंता ठाकूर, दामोदर पाटील, गोपाळ वारगे, वाणदे ग्रामस्थ, अंबिका महिला मंडळ, बाल मित्रयुवक क्रीडा मंडळ वाणदे यांनी केले आहे.

Exit mobile version