विद्यार्थ्यांचा न्यायासाठी आक्रोश
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नीट प्रवेश प्रक्रियेतील कथित गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. मुसळधार पावसाची पर्वा न करता शेकडो विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाल्याने चौक घोषणांनी दणाणून गेला.
हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन आंदोलनकर्त्यांनी शासन आणि संबंधित यंत्रणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवावा, नीट प्रवेश प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना तातडीने न्याय मिळावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
भरपावसातही आंदोलनकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. “विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे”, “भवितव्याशी खेळ थांबवा”, “नीट प्रक्रियेत पारदर्शकता आणा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या निर्धारामुळे आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शेकाप, मनसे आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी केली. नीट प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. भरपावसात विद्यार्थ्यांनी दाखविलेला निर्धार आणि विविध राजकीय पक्षांनी दिलेला पाठिंबा यामुळे हे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. आता विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
