एमएसईबी उरण कार्यालयावर शेकाप धडकणार

9 जुलैला जाहीर मोर्चाचे आयोजन

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील विद्युत मंडळाने उन्हाळ्यासह पावसाळ्यात विजेचा सततचा खंडित प्रवाह करून नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडला आहे. हजारों नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा विचार करून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उरण एमएसईबी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा आयोजित केला असल्याचे शेकाप उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी अर्ज देऊन जाहीर केले. यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते रायगड भूषण प्रा एल.बी. पाटील, उरण महिला चिटणीस सीमा घरत, रमाकांत पाटील, शहर महिला अध्यक्षा नयना पाटील, सिताराम नाखवा, विनोद पाटील, रंजना पाटील तसेच शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्याच्या गावागावांतील विजेचे बरेच खांब जीर्ण झाले आहेत. विजेच्या तारा तुटल्या आहेत. पावसाळ्यात तार पडून मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.तसेच ग्राहकांना भरमसाठ बिले येत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. लोकात असंतोष माजला आहे. नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे. आता हा मोर्चा जोरदार काढण्यासाठी पुढच्या आठवड्यापासून कार्यकर्त्यांनी गावोगाव प्रचार सुरू करण्याचे आयोजन केले आहे.

Exit mobile version