उमरोली न.पा. पुरवठा योजनेचे दुसर्यांदा भूमीपूजन
| माणगाव | वार्ताहर |
उमरोलीची नळपाणी पुरवठा योजना माझ्या आमदार फंडातून मंजूर झाली आहे. त्यामुळे आम्ही या योजनेचे भूमीपूजन करीत आहोत. शेकाप तसेच मी दुसर्यांच्या कामाचे श्रेय कधीच घेत नाही, असे रोखठोक विधान शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केले. माणगाव तालुक्यातील खरवली येथील उमरोली गावाची नळपाणी पुरवठा योजना जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली आहे. या योजनेचा भूमीपूजन समारंभ पहिल्यांदा रविवार, दि.28 नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला. तर, दुसर्यांदा याच योजनेचे भूमीपूजन शनिवार, दि. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी आ. जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना आ. पाटील यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर टीका करीत आम्ही इतरांच्या कामाचे श्रेय घेत नाही.हे काम माझ्या आमदार निधीतून मंजूर झाले आहे. आमच्या कामाचे श्रेय आम्ही घेतो, असे सांगितले. यावेळी माजी आमदार पंडित पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, राजिप सदस्या आरती मोरे, तालुका चिटणीस रमेश मोरे आदींसह उमरोली ग्रामस्थ, महिला मंडळ उपस्थित होते. यावेळी आ. जयंत पाटील यांच्या हस्ते उमरोली गावातील मराठी शाळेचे व नवीन अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले.