शेकाप पदाधिकार्‍यांनी सिडकोच्या फलकाला घातला चपलांचा हार

। पनवेल । वार्ताहर ।
पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने तक्रार करण्यासाठी कामोठे सिडकोच्या कार्यालयात गेलेल्या शेकाप पदाधिकार्‍यांनी सिडकोच्या फलकाला चपलांचा हार घालून निषेध केला. कामोठ्यात अनेक दिवसांपासून पाणी ठरलेल्या वेळी, नियमित येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणारी सिडकोची धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र उन्हाळ्यापासून सुरू असलेली पाणीटंचाई सिडको अद्यापही कमी करू शकलेली नाही. कामोठे आणि खारघर परिसरात सिडकोकडून हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सिडकोने पाणीपुरवठा सुरळीत केल्याचा दावा केला असला तरी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. गृहसंकुलांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते, मग इतरांना का नसते, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कामोठ्यात रात्री अपरात्री पाणी सोडले जात नसल्यामुळे चाकरमान्यांना पाणी भरण्यासाठी पाणी कधी येईल, याची वाट पाहावी लागते. झोपही पूर्ण होत नसल्यामुळे मुलांच्या शाळा, नोकरी व्यवसायावर परिणाम होतो आहे. शेकापचे कामोठे शहराध्यक्ष अमोल शितोळे यांनी सिडकोला जाब विचारण्यासाठी माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, सखाराम पाटील यांच्या समवेत सिडकोच्या कामोठ्यातील सेक्टर सहा येथील कार्यालयात जाऊन पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास सिडकोविरोधात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. कार्यालयात उपस्थित सहाय्यक अभियंता प्रशांत चहारे यांनी याबाबत कोणतेही ठोस उत्तर न दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी कार्यालयाबाहेर लावलेल्या सिडकोच्या फलकाला चपलांचा हार घालून सिडको प्रशासनाचा निषेध केला. सर्वत्र चांगला पाऊस पडत असताना नागरिकांना कामोठ्यात पाणीटंचाई सहन करावी लागते आहे. लवकरात लवकर पाणी सुरळीत न आल्यास शेकाप तीव्र आंदोलन करणार असल्याचे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी सांगितले. यावेळी गौरव पोरवाल, शुभांगी खरात यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version