| आगरदांडा-मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची निर्णायक मते असून इतर पक्षांपेक्षा पक्षाची स्थिती अधिक मजबूत करण्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत, असे तालुका चिटणीस अजित कासार यांनी जाहीर केले.
आगामी काळात होणार्या नगरपरिषद व जिल्हापरिषद निवडणुकीत शेकाप मोठी कामगिरी करणार आहे. जास्तीत जास्त जागा जिंकून आम्ही आमचा चढता आलेख सर्वाना दाखवून देणार आहोत. दूर गेलेल्यांना जवळ घेऊन नवीन पक्षप्रवेश घेऊन तालुक्यात स्थान बळकट करण्यावर प्रयत्न करणार आहोत.
अजित कासार
तालुका चिटणीस
तालुका चिटणीसपदी नियुक्ती झाल्यावर ते प्रथमच पत्रकारांशी चर्चा करताना आपले मनोगत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत विहूर माजी सरपंच रमेश दिवेकर व नांदगाव माजी सरपंच मुब्बशीर लालसे उपस्थित होते.
यावेळी अजित कासार यांनी सांगितले की आमदार जयंत पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, जिल्हा सहचिटणीस मनोज भगत व जेष्ठ नेते कृष्णा गिदी व तुकाराम पाटील यांनी माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्यास तालुका चिटणीसची जबाबदारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आहे. सदरचा विश्वास मी सार्थक करून दाखवणार आहे.
आमचे कुटुंब सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून शेकापसोबत आहे. राजपुरी जिल्हा परिषद मतदार संघातून माझी पत्नी नम्रता कासार ही मोठ्या मताधिक्यांनी निवडून आलेली आहे. या पुढील निवडणुकीत या जिल्हापरिषद मतदार संघात शेकापचाच प्रभाव कायम राहणार आहे. कारण या मतदार संघात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामे आम्ही केल्याने येथील जनता हि शेकाप सोबतच राहणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
पुढील काळात मुरुड तालुक्यातील सर्व सहकर्याना सोबत घेऊन पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, आगामी काळात होणार्या सरपंच, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य जास्तीत जास्त निवडून आण्यासाठी प्रत्येक कार्यकर्तनसमवेत परिश्रम घेऊन विजयश्री नक्कीच खेचून आणू असे ते म्हणाले.
अलिबाग – मुरुड विधानसभा क्षेत्रात पुढील होणार्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निवडून येण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज असून यासाठी विशेष मोहिमे अंतर्गत काम करण्याची सुरुवात केली असून यात आम्हाला निश्चितच यश मिळणार आहे. गेलेली आमदारकी आम्ही पुन्हा खेचून आणू असा विश्वासही कासार यांनी व्यक्त केला आहे.