परहूरमध्ये शेकापची सरशी

रायगडात चार थेट सरपंच, तर 30 सदस्यांसाठी निवडणूक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत चार थेट सरपंच, तर 30 ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. तर पाच तालुक्यांतील प्रत्येकी एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 4 हजार 642 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 65.23 टक्के मतदान झाले.

अलिबाग तालुक्यातील परहूर ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सचिन रामचंद्र पाटील यांनी मनिषा रामचंद्र पाटील यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव करीत विजय मिळवला. त्यांच्या विजयामुळे शेकाप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी शेतकरी भवन येथे त्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.

अलिबागसह कर्जत, सुधागड, तळा आणि श्रीवर्धन येथे प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. अलिबागमध्ये 86.64 टक्के, कर्जतमध्ये 92.81, सुधागडात 47.03, तळा तालुक्यात 56.04 आणि श्रीवर्धन येथे 57.23 टक्के मतदान झाले. तसेच थेट सरपंचपदासाठी अलिबाग तालुक्यातील कुरुळमध्ये अ‍ॅड. सुलभा जनार्दन पाटील, कोप्रोलीत योगिता राकेश पाठारे, कर्जत तालुक्यातील तीवरे येथे सुनिता हरिश्‍चंद्र दगडे, तर महाड तालुक्यातील कुंभे शिवथर येथे रमेश प्रभाकर सकपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील 30 ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली. यामध्ये अलिबाग तालुक्यातील शहापूर, रामराज, नवेदर नवगाव येथील प्रत्येकी एक, तर कोप्रोलीमध्ये चार सदस्यांची निवड बिनविरोध पार पडली. पेण तालुक्यात वाशिवली, झोतिरपाडा, पाटणोली, पनवेलमध्ये आकुर्ली, उरण तालुक्यात नवघर, कोप्रोली, कर्जत तालुक्यातील माणगाव, वाकस, पाषाणे, सावेळे, भिवपूरी, पोटल, तिवरे तसेच सुधागडमध्ये ताडगाव, माणगावमध्ये देवळी, महाड तालुक्यात वाळण बु.मध्ये दोन, पोलादपूरमधील एक, तर श्रीवर्धन तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीमध्ये दोन सदस्यांचा समावेश आहे.

Exit mobile version