| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारात शेतकरी कामगार पक्ष आघाडीवर आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात देखील शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे विजयासाठी जोरदार आघाडी घेतली आहे.
कर्जत तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांच्या जवळ मोठे जनमत आहे. शेकापचा बालेकिल्ला समजले जाणार्या कर्जत तालुक्यात आजही शेकाप जनाधार मिळवून आहे. त्यामुळे पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी इंडिया आघाडी साठी सर्व ताकदपणाला लावला आहे. रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवारसाठी शेकाप निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात माहविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराची जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाने पनवेल आणि उरण मतदारसंघात आपल्या खांद्यावर घेतली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते यांच्या एक पाऊल पुढे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
कर्जत तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे आणि पक्षाचे तालुका चिटणीस श्रीराम राणे यांच्या नेतृत्वाखाली शेकापचे नेते विलास थोरवे, पुंडलिक शिनारे, महेश म्हसे, बबन भालेराव, प्रकाश फराट, माजी सभापती गजानन पेमारे, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजू हजारे, राजेद्र विरले, कृष्णा बदे, धर्मा निरगुडे, कृष्णा शिंगे, रवींद्र भोईर, पांडुरंग बदे, युवक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. शेकापाकडून शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या एक पाऊल पुढे जावून प्रचार केला जात असल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या 100 टक्के मतदारांनी संजोग वाघेरे -पाटील यांच्यासाठी मतदान करतील असे शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे यांनी स्पष्ट केले आहे.







