संतोष जगंम व दिनेश फराट यांची बिनविरोध निवड
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी शेकापक्षाचे नेते उपनगराध्यक्ष संतोष जगंम तर बांधकाम सभापतीपदी दिनेश फराट यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत दोन्हीही नवनिर्वाचित सभापतींवर शुभेच्छांंचा वर्षाव होत आहे.
खालापूर नगरपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाची एकाहाती सत्ता होती. विकासात्मक कामे करण्यासाठी शेकापक्षाचे नेते संतोष जंगम यांना घेतल्याशिवाय कामे करूच शकत नसल्याचे आ. महेंद्र थोरवे यांच्या लक्षात आले, त्यानंतर शेकापक्षाचे नेते संतोष जंगम यांना उपनगराध्यक्षपद देत सत्तेत सामावून घेतले होते. विविध विभागातील सभापतींचा कार्यकाल संपल्यानंतर बुधवारी दि. (7) नगरपंचायतीच्या दालनात निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अजित नैराळे यांच्या उपस्थित घेण्यात आली. याप्रसंगी प्रभारी मुख्याधिकारी वैभव गारवे, नगर अभियंता, प्रभारी कार्यालय अधिक्षक देवेंद्र मोरखंडीकर यांनी काम पाहिले.
एकूण चार सभापती पदासांठी शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि शेकापक्षाचे दोन अर्ज प्राप्त झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने अर्ज न भरल्यामुळे स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी शेकापक्षाचे नेते उपनगराध्यक्ष संतोष जगंम तर बांधकाम सभापतीपदी दिनेश फराट तर शिवसेना शिंदे गटाचे किशोर पवार पाणीपुरवठा सभापती, मीना वाघमारे महिला बालकल्याण सभापती, सुनिता पाटील महिला बालकल्याण उपसभापती यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.