शेकापनेच गरीबांपर्यंत शिक्षण पोहचविले – पंडित पाटील यांचे प्रतिपादन

बामणगाव हायस्कूलच्या इमारतीचे भुमीपूजन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी गरीबांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचे काम केले तर काँग्रेसने शिक्षण शहरांपूरते मर्यादित ठेवण्याचे काम केले. बहुजन समाजाला खर्‍या अर्थाने शिक्षण देण्याचे काम स्व. दत्ता पाटील, स्व. प्रभाकर पाटील यांनी केले. मात्र पक्षाचा इतिहास सांगण्यात आपण कमी पडलो असे उद्गार शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त होणारे शिक्षक अविनाश ठाकूर यांचा सत्कार पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
बामणगाव हायस्कूलच्या नवीन इमारतीचे भुमीपूजन पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ तथा कबन नाईक, शेकापचे तालुका चिटणीस अनिल पाटील, बामणगाव हायस्कूलचे शाळा समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, मुख्याध्यापीका स्नेहा पाटील, माजी मुख्याध्यापक दिपक मोकल, शरद कुंटे, विजय कुंटे, सुरेश म्हात्रे, नरेंद्र उले, अविनाश ठाकूर, सतीश भगत, ग्रा. प. सदस्य लंकेश नागावकर आदी उपस्थित होते.
पंडीत पाटील पुढे म्हणाले की, रायगड जिल्ह्यात पहिली शिवजयंती स्व. प्रभाकर पाटील यांनी पोयनाड येथे सुरु केली. यावेळी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांना प्रमुख पाहूणे म्हणून आणले होते. तेंव्हा शिवसेना अस्तित्वात देखील नव्हती. 71 साली बामणगाव हायस्कूल होण्यासाठी प्रभाकर पाटील यांनी मागणी केली. अलिबाग तालुक्यात अनेक घरात पती पत्नींना शेकापक्षाने शिक्षकांच्या नोकर्‍या दिल्या त्यांच्याच घरातील लोकं शेकापक्षाने काय केले असा प्रश्‍न विचारतात. अलिबाग तालुक्यातील सर्व रस्ते आपण आमदार असताना मंजुर केले आहेत. पाण्याच्या योजना देखील शेकापच्या माध्यमातून मंजूर केल्या असल्याचेही पंडित पाटील यांनी सांगितले. सध्या स्पर्धेचे वातावरण आहे. पटसंख्या कायम राहिली नाही तर शिक्षकांनो तुम्ही अतिरिक्त व्हाल असा इशारा देताना भविष्यात नोकर्‍या टिकवायच्या असतील तर शिक्षणाचा दर्जा मेेंटेन ठेवणे आवश्यक असल्याचेही पंडित पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ पाटील यांनी आपल्या मनोगतात बामणगाव शाळेचे कौतुक केले. ही शाळा निकालात नेहमी अग्रेसर असून सतत 100 टक्के निकाल लावून आपला ठसा उमटवला आहे. तर तालुका चिटणीस अनिल पाटील म्हणाले की, शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी निवृत होत असलेल्या अविनाश ठाकूर यांचे कार्याचा कौतुक करताना अनिल पाटील म्हणाले की अविनाश ठाकूर यांची उणीव भासेल, त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विधायक कामे केली. आज जरी ते सेवेतून निवृत्त होत असले तरी ते समाजकार्यातून निवृत्त झालेले नाहीत याची त्यांनी जाणीव ठेवून काम सुरुच ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अविनाश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन सत्काराला उत्तर दिले. सुत्रसंचलन एस व्ही म्हात्रे यांनी तर आभार स्नेहल पालकर यांनी मानले.

Exit mobile version