क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विचारांना अभिप्रेत कार्य करू- खा. सोनवणे
| बीड | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी केजमध्ये सुरू असलेला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाचा पुरस्कार सोहळा बीडमध्ये घेऊन आले, ही कौतुकाची बाब आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य चंद्र-सूर्य असेपर्यंत जनमानसात जिवंत राहील. त्यांच्या विचारांना अभिप्रेत असे कार्य खासदार या नात्याने करण्याचा मी प्रयत्न करीन, अशी ग्वाही खा. बजरंग सोनावणे यांनी सांगितले.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी (दि.3) शेतकरी कामगार पक्ष व क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण आणि क्रांतिसिंह नाना पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खा. बजरंग सोनवणे बोलत होते.
पक्षाचे ध्वजारोहण राज्य चिटणीस मंडळ सदस्या चित्राताई गोळेगावकर व प्रा. उमाकांत राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ नेत्या सुशीला मोराळे, माजी आमदार उषा दराडे, शेकापचे जिल्हा चिटणीस भाई विष्णूपंत घोलप, राजकुमार घायाळ (हमाल मापाडी महामंडळ), ॲड. अजय बुरांडे (माकप), इकबाल पेंटर, चंद्रकांत चव्हाण (शिक्षक आघाडी), भाऊराव प्रभाळे (भाकप), राजेश घोडे (आझाद क्रांती सेना), रोहिदास जाधव (एसएफआय), प्रा. पंडित तुपे (युक्रांद), गणेश मस्के (संभाजी ब्रिगेड), ॲड. राहुल वायकर (विभागीय संभाजी ब्रिगेड), नितीन सोनवणे (पँथर सेना), सुभाष लोणके (डीपीआय), ॲड.शिवाजी कांबळे (समाजवादी पक्ष), अशोक येडे (आप) आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. बजरंग सोनवणे म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य सुरू झाले, तेव्हा माझा जन्मही झालेला नव्हता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भाई मोहन गुंड गेल्या अनेक वर्षांपासून पुरस्कार सोहळा आयोजित करत आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज प्रबोधन करत विविध समाजघटक एकत्र आणले. परंतु, अलीकडील काळात जातीय विष पसरवणारे काहीजण वाढले आहेत. असे लोक कोणत्याही समाजाचे नसतात. त्यांना थारा देऊ नये. भाई मोहन गुंड यांचे कार्य राज्यभर सुरू आहे. केजचे सुपुत्र म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे खा. बजरंग सोनवणे म्हणाले. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भाई मोहन गुंड यांनी केले, सूत्रसंचालन व्याख्याते राहुल गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. नारायण गोले पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाई बापुसाहेब साळुंके, नागेश मिठे, अर्जुन सोनवणे, अशोक रोडे, संदीप पन्हाळे, अंगद मोहिते, मुकुंद शिंदे यांच्यासह इतरांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाई मोहन गुंड यांचे कौतुक
भाई मोहन गुंड व पक्षातील कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. यानिमित्त अनेक वर्षांनंतर जिल्हाभरातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. मान्यवरांनी त्यांच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सन्मान
अरुण जाधव (राजकीय), राजाभाऊ देशमुख (कृषी), सुधाकर देशमुख (पर्यावरण), डॉ. संदीप तांबारे (आरोग्य), शाहीर राजेंद्र कांबळे (सांस्कृतिक), कॉ. राजकुमार कदम (शैक्षणिक), उज्ज्वला पडलवार (कामगार), ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर (सांप्रदायिक), संपत मोरे (पत्रकारिता), जागृती अमरजीत तिवारी (क्रीडा) या मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.











