न भूतो न भविष्यती असा साजरा होणार शेकापचा वर्धापन दिन

सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी घेतला आढावा

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाची जोरदार तयारी सुरू असून न भूतो न भविष्यती असाच हा सोहळा साजरा होणार असल्याने संपूर्ण राज्यात याची दखल घेतली जात आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत तयारीचा आढावा घेतला. यावेळी पक्षाचे माजी कार्यालयीन चिटणीस प्रा एस व्ही जाधव, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची भुमीका बजावणार्‍या शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन 2 ऑगस्ट रोजी पेण तालुक्यातील वडखळ येथे मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे. या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्ष काय भुमीका घेणार आहे याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर होणार्‍या या वर्धापन सोहळ्याला महत्व आले आहे. या निमित्ताने शेकापच्या गावोगावी होत असलेल्या संपर्क बैठकांमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या सोहळ्यासाठी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते, मंत्री गोपाळ राय, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी, शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पक्षाचे जिल्हा चिटणीस ॲड आस्वाद पाटील यांनी या मेळाव्यासाठी 30 हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. कार्यकर्त्यांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता यावेळी सभा मंडप देखील तिप्पट आजारात बनविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धापन दिनाला उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिस्तीचे पालन करीत आपल्या वाहनावर लाल बावटा फडकवित उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

अलिबाग तालुक्यातून निघणार बाईक रॅली

वर्धापन दिनाला उपस्थित राहण्यासाठी अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने बाईक रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष विक्रांत वॉर्डे यांनी दिली.
2 तारखेला सकाळी 11 वाजता बाईक रॅली निघणार आहे.त्यामुळे सर्वांनी वेळेत बाईक रॅली साठी यावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Exit mobile version