शेकापची रणरागिणी कडाडली; भाजप खा. चिखलीकरांना खडे बोल

| लोहा | प्रतिनिधी |

लोहा शहरातील नियोजित ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या श्रेयावरून खा. प्रतापराव चिखलीकर आणि शेकाप आ. श्यामसुंदर शिंदे श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या तापलेल्या राजकारणात आता शेकाप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा आशा शिंदे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सख्खा भाऊ असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांचे वाभाडे काढले आहेत. महिलांची इज्जत करायला शिका, असा सल्लाही त्यांनी आपल्या बंधुरायांना दिला आहे.

शिवजयंतीनिमित्त लोहा येथे शिवपुतळ्याचे अनावरण आयोजित करण्यात आले होते. समारंभस्थळी हा पुतळा नेत असताना माळेगाव येथून खा. चिखलीकर यांच्या हस्ते या पुतळ्याच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मात्र तेथे आ. श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे यांनी प्रथम पूजन करुन पुतळ्याचे स्वागत केले. यावरुन चिखलीकर आणि शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक वादविवाद सुरु झाला.

माळाकोळी येथे पुतळ्याच्या स्वागतासाठी खासदार, आमदार समर्थक एकत्र थांबले असताना आ. श्यामसुंदर शिंदे यांनी दंड थोपटून आपण उभे आहोत कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे डिवचलेल्या चिखलीकरांनीही दंड थोपटले. हे पाहून खवळलेल्या आशाताई शिंदे यांनी भर सभेतच रुद्रावतार धारण करुन चिखलीकरांचा शेलक्या भाषेत समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे सार्‍या देशाचे आदर्शवत आहेत. त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांचाच आदर केला. विशेष करुन रयतेच्या राजाकडून महिलांचा नेहमीच आदर करण्यात आल्याचे त्यांनी सुचित केले. मात्र हल्लीचे राज्यकर्ते छत्रपतींचे नाव राज्यकारभार करतात मात्र त्यांच्या राज्यात महिलांचा सन्मान राखला जात नसल्याबद्दल जोरदार हल्लाबोल केला. महिलांची इज्जत करायला शिका, असा सल्लाही त्यांनी चिखलीकरांना दिला.

तत्पूर्वी प्रताप चिखलीकर यांनी आपल्या भाषणातून जिल्ह्याचे राजकारण बदलले असून, हल्ली बायकांना पुढे करुन राजकारण करीत असल्याची टीका केली होती. त्यावरही आशाताई शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान, आ. श्यामसुंदर शिंदे यांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. लोहा-कंधार मतदार संघाच्या बाहेर असणार्‍या खासदारांची हुकूमशाही सुरु असून, तालुक्यातील जनता हुशार आहे. आगामी काळात होणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये शेकाप मोठ्या जोमाने उतरुन यश संपादित करील, असा दावाही त्यांनी केला. पुतळा अनावरणप्रसंगी पोलिसांकडून जनतेवर जो लाठीहल्ला झाला त्याचा शिंदे यांनी निषेध केला आहे.

Exit mobile version