| रायगड | प्रतिनिधी |
राज्यासह जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी प्रचार सभा सुरु झाल्या आहेत. शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्यावतीने बुधवारी अलिबाग तालुक्यासह अनेक तालुक्यांत सभांचे आयोजन करण्यात आले होते. शेकापचे नेते सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा होणार होत्या. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.28) सकाळी विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शेकापचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्या सर्व बैठका, सभा रद्द केल्या आहेत. शेकापमार्फत असणाऱ्या सर्व प्रचार सभा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील आदी शेकापचे नेते बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे पोहोचले.
कार्यकर्ते बारामतीकडे रवाना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधननाने राज्यासह रायगड जिल्ह्यात देखील शोककळा पसरली आहे. गुरुवारी (दि. 29) सकाळी अकरा वाजता, बारामती येथे पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अजित पवार यांच्या निधनाची माहिती समजताच रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते बारामतीकडे रवाना झाले आहेत. त्यामध्ये ॲड. प्रवीण ठाकूर, अमित नाईक, चारू मगर, हर्षल पाटील आदी राष्ट्रवादीचे जिल्हा, तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते रवाना झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
