| पेण | प्रतिनिधी |
गेली कित्येक महिने शेतकरी कामगार पक्ष संपला म्हणणाऱ्यांच्या तोंडात जोरदार चपराक पेण तालुक्याचे चिटणीस प्रल्हाद पाटील यांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या बुधवारी शेवटच्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाच्या समर्थकांच्या बरोबर दादर गणातून प्रल्हाद पाटील, आणि जिते गणातून मोहिनी मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
पेण तालुका म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून संबोधले जात होते. मधल्या काळात पक्षातील काही नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश केल्याने काही मंडळी वलगना करत होते की, शेतकरी कामगार पक्ष संपला. परंतु, प्रल्हाद पाटील यांनी नव्याने शेतकरी कामगार पक्षाची मोट बांधून पेण तालुक्यातील जिते, दादर, वडखळ गणामध्ये जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज भरले आहेत. 20 जानेवारी रोजी संजय जांभळे यांनी वडखळ गटातून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. तर, 21 जानेवारी रोजी मोहिनी मोरे आणि स्वतः प्रल्हाद पाटील यांनी आपल्या समर्थकांसह येऊन उमेदवारी अर्ज भरला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे समर्थक गळ्यात लाल बावटा बांधून घोषणा देत प्रांत कार्यालयावर आले. एकंदरीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना कडवी झुंज देण्यासाठी सज्ज झाले असून, शेतकरी कामगार पक्ष संपला म्हणून बोलणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.







