जनतेची फसवणूक करणाऱ्यांना घरी बसवाः आ. जयंत पाटील
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
देशात, राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम केले जात आहे. वेगवेगळ्या शासकीय यंत्रणेचा वापर करीत दबाव टाकण्याचे काम केले जात आहे. दादागिरीसह जनतेची गळचेपी चालू आहे. सर्वसामान्यांना अडविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप आहे. लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीनंतर त्यांना त्यांची जागा कळणार आहे. त्या पध्दतीने आतापासूनच आपण सर्वांनी काम करायचे आहे. शेतकरी कामगार पक्षाने अनेकांना मोठे केले आहे, पण ते विसरले आहेत. त्यामुळे गद्दारांंना या निवडणूकीत गाडण्याची वेळ आली असून ज्यांनी दगाबाजी केली आहे, त्यांना या निवडणुकीतून जागा दाखविण्याचे काम केले जाणार आहे. वेगळ्या उमेदीने कार्यकर्त्यांनी कामाला लागून कार्यकर्त्यांनी फसवेगिरी करणाऱ्यांना घरी बसविण्याचे आवाहन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा बुधवारी (दि.27) हिंदू बोर्डींग मैदानात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.
यावेळी शरद पवार गटाचे आ. रोहित पवार, माजी आ.अनिल तटकरे, माजी आ. पंडित पाटील, आ. सुनील भुसारा, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, रायग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, साधना पाटील, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष विजय गिदी, निता गिदी, वामन चुनेकर, प्रमोद भायदे, माणिक चव्हाण, शरद चवरकर, पांडूरंग आगारकर, धर्मा हिरवे, अस्लम हळदे, कमळाकर माने, किर्ती शहा, दादा कमाने, मनिष माळी, मुसरत उल्डे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, शैला पाटील, अलिबागचे माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, संजना किर, संदीप घरत, अस्लम राऊत, ॲड. गौतम पाटील, सवाई पाटील, नवशाद दळवी, सतिश लोंढे, गिरीश जोशी, हाफिज कबले आदी मान्यवर, शेकापसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, सभासद, व कार्यर्ते व महिला उपस्थित होते.
याप्रसंगी आ. जयंत पाटील म्हणाले, कृष्णा गिदीसह मोतीराम पाटील यांचा मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्ष वाढविण्यामध्ये सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांची आठवण कायमच स्मरणात राहणारी आहे. मुरुड तालुक्यात शेकापचे साम्राज्य निर्माण करण्यामध्ये या ज्येष्ठांसह अनेक कार्यकर्त्यांचे योगदान राहिले आहे. शेतकरी कामगार पक्ष दिलेला शब्द पाळतो. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये अनेकांवर विश्वास ठेवून त्यांना शेतकरी कामगार पक्षाने जिंकून आणले आहे. त्याच पक्षाला संपविण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने केला जात आहे. मात्र शेतकरी कामगार पक्ष हा संघर्षातून निर्माण झालेला पक्ष आहे. एकनिष्ठ व स्वाभीमानी पक्ष आहे. गरीबांची बांधिलकी असणारा पक्ष आहे. याची जाणीव विरोधकांनी कायम ठेवली पाहिजे. शेतकरी कामगार पक्ष कधीही न संपणारा पक्ष आहे. जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांची पर्वा न करता शेकापचा लाल बावटा घेऊन सर्वांनी वेगळ्या उमेदीने कामाला लागा. शेतकरी कामगार पक्ष कधीही संपणा नाही, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
खा. सुनील तटकरे यांना मोठे करण्याचे काम त्यांचे बंधू अनिल तटकरे यांनी केले. मात्र त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तटकरेंनी केले आहे. या सुनील तटकरे पुन्हा उभे राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करायची आहे. आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांची पर्वा न करता शेकापचा लाल बावटा घेऊन सर्वांनी वेगळ्या उमेदीने कामाला लागा. शेकाप कधीही संपणार नाही, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
श्रमजीवींच्या विश्वासावर शेकाप उभा : पंडित पाटील काही कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून अन्य पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मुरुडमध्ये पक्ष संपला असे नाही, तर गोरगरीब, श्रमजीवींच्या विश्वासावर स्वाभीमानाने उभा राहणारा शेकाप आहे. सुनील तटकरेंच्या यशामागे अनिल तटकरेंचा मोलाचे योगदान राहिले आहे. मात्र त्यांच्याशीच सूनील तटकरेंनी गद्दारी केली आहे. त्यामुळे या निवडणूकीत सुनील तटकरेंना पाडण्याचा निर्धार आपल्याला करायचा आहे. लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन पंडित पाटील यांनी केले. त्यापुढे ते म्हणाले, एकेकाळी राष्ट्रवादी व शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात शेकापच्या मिनाक्षी पाटील 25 हजार मतांनी निवडून आल्या होत्या. आता इंडिया आघाडी पक्की झालेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जनतेच्या हितासाठी एकत्र या: आ. सुनील भुसारा शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी शेतकरी कामगार पक्ष काम करीत आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून आ. जयंत पाटील, पंडित पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, चित्रलेखा पाटील काम करीत आहेत. मात्र 50, खोके एकदम ओके या भावनेतून पक्ष बदलून गेले. त्यांनी नवीन टोळी निर्माण करून विकासावर डल्ला मारण्याचे काम केले. विकासाच्या नावाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना 500 कोटी रुपयांच्या प्रशासकिय मान्यता दिल्या. मात्र यामध्ये फक्त तीनच कोटी रुपयांची कामे करण्याची तरतूद आहे. लोकांना फसविण्यासाठी आणि स्वतःचे खिसे भरण्यासाठी हे सरकार काम करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेचे हित राखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायचे आहे, असे आवाहन आ. सुनील भुसारा यांनी केले.
शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने रुजविण्याचे काम करायचे आहे. देशाबरोबरच राज्यात परिस्थिती बिकट आहे. देशाचे संविधान धोक्यात येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुढे निवडणुका होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वांनी वैचारिक अदान-प्रदान करण्याची गरज आहे. जागरूकपणे तरुणांसह सर्वांनी मतदान करून उद्याच्या निवडणूकीला सामोरे जायचे आहे.
माजी आ. अनिल तटकरे
मुरुडमध्ये भाजप, शिंदे गटात भगदाड मुरुडमध्ये भाजप, शिंदे गट शिवसेनेच्या मनमानी कारभाराला कंटाळून मोरे, मिठागर, वाघोबावाडी, नांदगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजव शिंदे गटात मुरुडमध्ये भगदाड पडले असल्याचे चित्र दिसून आले आहे. भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश दिवेकर, मुरुड तालुक्यातील मोरे गावातील हरिश्चंद्र दिवेकर, सुबोध बामुगडे, गणेश मस्या दिवेकर, हेमंत दिवेकर, अजेय घोसाळकर, भाजपचे मुरुड तालुका किसान मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर, नरेंद्र शहापूरकर, निलेश ठाकूर, अनीश बैकर, गणपत बैकर, अमित शापूरकर, निकम माळी, शिवसेनेचे सुरेश मालवणकर, भाजप मुरूड तालुका आयटी सेलचे संदीप चिरायू आदी अनेक नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते जल्लोषात स्वागत करण्यात आले.