आक्षी गावाचा शेकापवर विश्वास; पुरोगामी युवक संघटनेचे कौतुक
| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
अनेक गंभीर प्रश्न सोडविण्याची शेतकरी कामगार पक्षाची परंपरा आहे. ज्यावेळेला गावे वाड्यांमध्ये प्रश्न निर्माण होतात तो साडविण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी कायमच केले आहे. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी त्यावेळी जनतेचे प्रश्न सोडविले. अलिबाग तालुक्यातील रायवाडी (आक्षी) गावातील मराठी शाळेजवळील सार्वजनिक विहीरीवर सोमवारी (दि.20) पाणी शुद्धीकरण संयंत्राचे उद्घाटन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या, काळ बदलत गेला परस्थिती बदलत गेली, नवे नवे प्रश्न निर्माण होत गेले. वाढती लोकसंख्या, धरणांमधील कमी होणारी पाण्याची पातळी, वाढती उष्णता, प्रशासकिय सहकार्याचा अभाव अशा अनेक समस्यांमुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शेकापच्या पुरोगामी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावांतील पाण्याच्या प्रश्नासाठी धाव घेतली. पाणी शुध्दीकरण संयंत्र बसवण्याची मागणी केली. त्यानुसार पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. उमटे धरणातील पाण्याच्या प्रश्नाबाबत काहीजण मोठा निधी आणण्याच्या बाता मारतात. जाहीरात बाजीकरून गाळ काढण्याचा दिखावा केला होतो. प्रत्यक्षात मात्र काम काही दिसून येत नाही. परंतु, शेतकरी कामगार पक्ष राजकारणापलिकडे जाऊन जनतेच्या हितासाठी धावणारा पक्ष आहे. गोरगरीबांशी बांधिलकी ठेवून काम करण्याची शिकवण या पक्षातून दिली गेली आहे. सामाजिक बांधिलकी जपत उमटे धरणातील 300हून अधिक ट्रक गाळ तीन दिवसामध्ये काढण्यात यश आले आहे. प्रशांत नाईक यांचेदेखील यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. उमटे धरणावर अवलंबून असणाऱ्या 44 गावांना मिळणाऱ्या पाण्याचा दर्जा नक्की सुधारेल, असा विश्वास यावेळी चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
आक्षी गावाने कायम शेकापवर विश्वास ठेवला आहे. रायवाडी गावात पाणी शुध्दीकरणाचे संयंत्र बसविण्याची संधी येथील शेकापच्या युवा कार्यकर्त्यांमुळेच मिळाली आहे. त्यांनी वेळोवेळी गावासाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले असून अभिजीत वाळंज आणि सर्व पुरोगामी युवक संघटनेचे चित्रलेखा पाटील यांनी विशेष कौतुक केले. यावेळी शेकाप जेष्ठ कार्यकर्ते द्वारकानाथ नाईक, सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, सदस्य रश्मी वाळंज, माजी सरपंच नंदकुमार वाळंज, शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते अभिजीत वाळंज, संतोष राऊळ, शक्ती बानकर, राजू बानकर, प्रणित गुरव, विलास राणे, रश्मिन गुरव, रविंद्र पाटील, सुनिल नाईक, सुमीत कवळे, उल्हास भाटे, किशोर पेरेकर, शिवनाथ पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या मागणीची घेतली दखल रायवाडी गावामध्ये उमटे धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, तीन ते चार दिवस आड पाणी पुरवठा केला जात असल्याने गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत आहे. पिण्यासाठी विकतचे पाणी आणावे लागत होते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेत येथील शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते अभिजीत वाळंज, संतोष राऊळ, शक्ती बानकर, राजू बानकर यांनी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्याकडे ही समस्या मांडली. समस्येचे गांभीर्य लक्षात घेत रायवाडी गावाचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यात आला. चित्रलेखा पाटील यांच्यामुळे गावातील सार्वजनिक विहीरीवर पाणी शुद्धीकरण संयंत्र बसवण्यात आले. या कार्याबद्दल सर्व स्तरांतून शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील व युवा कार्यकत्यांचे आभार तसेच कौतुक केले जात आहे.
शेकाप तुमच्या पाठीशी कायम उभेः द्वारकानाथ नाईक आज पाणी ही काळाची गरज आहे. पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुर्वी उमट्याचे पाणी येत होते. कालांतरनाने तेही पाणी येणं बंद झाले. त्यानंतर एमआयडीसी आली. पण त्याचेही पाणी प्रत्येक गावात पोहचू शकले नाही. आज आपण जे पाणी शुध्दीकरणाचे संयंत्र बसवले आहे ते कोणत्याही शासनाच्या निधीतून नाही तर चित्रलेखा पाटील यांनी स्वखर्चातून बसवलेले आहे. पुर्वीपासून शेकाप हा आक्षी व रायवाडी गावाच्या पाठीमागे सदैव उभा रहिलेला आहे. आजही चित्रलेखा पाटील यांच्या रूपाने शेकाप तुमच्या पाठीशी उभा आहे, असे गौरवोद्गार शेकाप ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक यांनी काढले.