| चणेरा | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद घोसाळा गटातून डॉ. वैष्णवी हेमंत ठाकूर, तर पंचायत समिती न्हावे व घोसाळा गटामधून रुपाली मढवी आणि शंकर दिवकर हे उमेदवार अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यावेळी शेकापचा निवडणूक प्रचार न्हावे येथून उत्साहात आणि जोमाने सुरू झाला. कुंडलिका नदीच्या डाव्या व उजव्या तीरावरील तब्बल 52 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देत तो तातडीने सोडविण्याचा ठाम निर्धार शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हस्कर यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना शंकरराव म्हस्कर म्हणाले की, पिण्याचे पाणी हा मूलभूत हक्क असून अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शेतकरी कामगार पक्ष सत्तेत आल्यानंतर या प्रश्नावर तात्काळ आणि शाश्वत तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. घोसाळा मतदारसंघातील ढासळलेल्या आरोग्यसेवेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी शेकापक्ष आघाडीवर राहून संघर्ष करेल. प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य कर्मचारी व आवश्यक सोयी-सुविधा याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. तसेच, महिला सबलीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हसकर यांनी, महिला बचत गटांतील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी उद्योग-व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ठोस व कृतीशील काम पक्ष हाती घेणार असल्याचे सांगितले. केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कृतीतून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हस्कर, तालुका चिटणीस शिवराम महाबळे, कार्यालयीन चिटणीस संदेश विचारे, आरे सरपंच राजेंद्र मळेकर, मजदूर फेडरेशनचे हेमंत ठाकूर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गोपिनाथ गंभे, व्हाइस चेअरमन विकास भायतांडेल, खांडेकर, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष संतोष दिवकर, उपाध्यक्ष अमोल शिंगरे, शंकर दिवकर, अभिजीत शिंगरे, विठ्ठल मोरे, खेद ढमाळ, हेमंत भायतांडेल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






