कर्जत तालुक्यासाठी शेकापची नवीन कार्यकारिणी जाहिर

। नेरळ । प्रतिनिधी ।
कोरोनामुळे गेली दोन वर्षे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र आता शेकापच्या कर्जत तालुक्यातील पदाधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांच्या निधनानंतर साधारण दोन वर्षे ते पद रिक्त ठेवण्यात आले होते. त्यात पक्षाचे काम थांबू नये, यासाठी प्रभारी चिटणीस पदाची जबाबदारी श्रीराम राणे यांच्याकडे देण्यात आली होती. आता कर्जत तालुका शेकाप तालुका चिटणीस पदाची जबाबदारी श्रीराम राणे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानंतर तालुक्यातील दोन महत्वाच्या पदांबाबत सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी चर्चा केली. तसेच तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष म्हणून मानिवली ग्रामपंचायतमधील कार्यकर्ते महेश म्हसे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी चिंचवली ग्रामपंचायतमधील कार्यकर्ते वैभव भगत हे पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष होते. तर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंती हिंदोळा यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

कर्जत तालुका शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे यांच्या उपस्थितीत पदाधिकार्‍यांच्या निवडी केल्या असून त्या दोन्ही पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे तसेच विभाग चिटणीस पांडुरंग बदे, पक्षाचे अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष बबन भालेराव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. त्यामुळे नवीन पदाधिकार्‍यांवर रायगड जिल्हा परिषद तसेच कर्जत पंचायत समितीमध्ये पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी विशेष जबाबदारी आली आहे.

Exit mobile version