आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे येथे शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे रविवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कामोठे शहराचा विकास हा फक्त शेतकरी कामगार पक्षामुळे झाला, असे आ. बाळाराम पाटील यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, हे कोमोठे शहर साडेबारा टक्क्यांवर वसले आहे. त्यावेळी शासनाने आम्हाला 1000/- रुपये सांगितले. परंतु, आम्ही या ठिकाणी प्रत्येक गुंठ्याला 1,00,000 (एक लाख) शासनाला दिले, याचमुळे या ठिकाणी फूटपाथ, रस्ते आणि सेव्हरेज लाईनची कामे सिडकोने केली आहेत.
या उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय पाटील, नगरसेवक शंकर म्हात्रे, नगरसेवक गोपाळ भगत, प्रमोद भगत, कामगार नेते प्रकाश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या प्रास्ताविकात नगरसेवक शंकर म्हात्रे यांनी सांगितले, की कामोठे येथे शेकापचे मध्यवर्ती कार्यालय गरजेचे होते, तेव्हा आता या ठिकाणाहून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. पनवेल महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढवणार असून, महाविकास आघाडीचा धर्म पाळू, असेही त्यांनी सांगितले.