शेकापचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

कामोठे सब स्टेशनसाठी

। पनवेल । वार्ताहर ।

कामोठे नोडमध्ये विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. नोडमधील एकमेव उपकेंद्रावर भार वाढला आहे. त्यामुळे शटडाऊनसारख्या घटनेत वाढ झाली आहे. शेकाप कामोठे शहराध्यक्ष अमोल शितोळे यांनी अतिरिक्त उपकेंद्र सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कामोठे नोड अंतर्गत कामोठे, जुई, नौपाडा येथे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. लोकसंख्या तीन लाखांच्या घरात पोहोचली आहे. या नोडमध्ये सुमारे 60 हजार वीज ग्राहक आहेत. खारघर येथून 400 केव्ही ट्रान्समिशन सबस्टेशनवरून 33 केव्हीच्या दोन फिडरवरून ओव्हरहेड लाईनमार्फत कामोठ्यातील सेक्टर 9 मधील सबस्टेशनला वीजपुरवठा होतो. उन्हाळ्याच्या दिवसात उकड्यामुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होते. त्यामुळे सेक्टर 9 मधील सबस्टेशनवर अतिरिक्त भार येत असल्याने तांत्रिक बिघाड, देखभाल दुरुस्तीसाठी शटडाऊन यासारख्या घटनेत वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त खारघर येथून येणार्‍या ओव्हरहेड लाईनवर कावळ्यामुळे तांत्रिक बिघाडाच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून, महावितरणाच्या डोकेदुखीत भर पडत चालली आहे.

महावितरणाने कामोठे सेक्टर 25 मध्ये सब स्टेशन उभारण्यासाठी सिडकोकडे निःशुल्क जागा मागितली आहे. सिडकोने निःशुल्क जागा देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे सब स्टेशनचे घोंगडे भिजत पडले आहे. शेकाप कामोठे शहराध्यक्ष अमोल शितोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याप्रकरणी लक्ष देण्याची मागणी केली आहे. ठाणा नाका परिसरात पनवेल टिंबर मार्ट या ठिकाणी ट्रान्समिशनच्या नवीन सब स्टेशनचे काम सुरू आहे. या ठिकाणाहून खांदेेश्‍वर व मानसरोवर येथे सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या सब स्टेशनवरुन कामोठे नोडला वीजपुरवठा केला जाणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

कामोठे नोडमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज ग्राहक नियमित बिल भरतो. वीज ग्राहकाला सुरळीत वीजपुरवठा करण्याची महावितरणाची जबाबदारी आहे. सेक्टर 9 मधील सबस्टेशन वीजपुरवठा करण्यासाठी सक्षम नसल्याने अतिरिक्त सब स्टेशन सुरू करण्याची गरज आहे.

अमोल शितोळे, अध्यक्ष,
शेकाप कामोठे शहर
Exit mobile version