सुशिक्षित डॉक्टर उमेदवाराला जनतेची पसंती
। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची ठरत असली तरी चणेरा विभागातून शेतकरी कामगार पक्षाचा विजय निश्चित असून, घोसाळे मतदारसंघात पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे, असा ठाम दावा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केला. चणेरा विभागातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.
चित्रलेखा पाटील म्हणाल्या, तत्पर सेवेकर आम्ही, पाटील प्रभाकर या उक्तीप्रमाणे आमचा उमेद्वार हा सुशिक्षित, पात्र आणि डॉक्टर असलेली तरुणी आहे. ती सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य, शिक्षण व मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने काम करणार आहे. चणेरा हा शेकापचा बालेकिल्ला असून येथील मतदारांनी नेहमीच खटारा चिन्हावर विश्वास टाकला आहे. यावेळीही प्रचंड मताधिक्याने विजय आमचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दहा वर्षांत विकासाचा जो खंड पडला आहे, तो भरून काढण्यासाठी शेकाप कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांना केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व हवे आहे. त्यामुळेच डॉक्टरेट पदवीधर, सुशिक्षित उमेदवार जनतेसमोर उभा केला असून याला युवकांसह पारंपरिक मतदारांचा देखील भक्कम पाठिंबा मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सत्ताधारी महायुतीमध्येच अंतर्गत फूट पडलेली असून, शिंदे गटातील वाद तसेच एकूणच राजकीय अस्थिरता स्पष्टपणे दिसून येत आहे. या गोंधळाचा थेट फायदा शेकापला होणार असल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय ‘ताईची सावली’ या योजनेअंतर्गत पडझड झालेल्या सुमारे दोन हजार घरांना अनुदान देऊन सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चणेरा विभागात ऍग्रो फॅक्टरी उभारण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला.
एमआयडीसीच्या नावाखाली भूमिपुत्रांची फसवणूक होत असून, अत्यल्प दरात जमिनी घेतल्या जात असल्याचा आरोप करत चित्रलेखा पाटील यांनी एमआयडीसीतील पाण्याच्या बिलांचा घोटाळा लवकरच उघडकीस आणणार असल्याचा इशाराही दिला. राजकारणात वाढत चाललेली फसवणूक आणि संघर्ष पाहता जनतेला प्रामाणिक, काम करणारे नेतृत्व हवे आहे. त्यामुळेच 42 घोसाळे जिल्हा परीषद गटातून डॉ. वैष्णवी ठाकूर, 84 घोसाळे पंचायत समीती गणातून शंकर दिवकर व 83 न्हावे पंचायत समिती गणातून रुपाली मढवी उमेदवार असून यावेळी शेतकरी कामगार पक्षाला भरघोस यश मिळेल, असा ठाम विश्वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी आरडीसी बँक संचालक गणेश मढवी, मजदूर फेडरेरेशन चेअरमन हेमंत ठाकूर, कार्यालयीन संदेश विचारे, विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष गोपीनाथ गंभे, उपाध्यक्ष विकास भायतोंडेल, पुरोगामी युवक संघटनाअध्यक्ष संतोष दिवकर, उपाध्यक्ष अमोल शिंगरे, ॲड. नितेश ठाकूर, महादेव खार सरपंच संकेत जोशी, खैरे खुर्द उपसरपंच जुबेर धनसे, माजी सरपंच न्हावे राजेश्री शाबासकर, आरुणा तांबडे, गिरीष दांडेकर, गणेश वाघीलकर, रूपेश ठाकूर, मयंक ठाकूर, गौरव मढवी, अर्पणा मढवी यांच्यासह विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकापने नेहमीच तळागाळातील जनतेसाठी काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्याचा पक्षाचा मानस असून, यापूर्वी हजार सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात तीन ते पाच हजार विद्यार्थ्यांना सायकली देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
-चित्रलेखा पाटील
शेकाप प्रवक्त्या






