माथेरानमध्ये शेखरुचे दर्शन

। माथेरान । वार्ताहर ।

जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान मध्ये पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. माथेरानच्या निसर्गात वनसंपत्तीचा अमूल्य ठेवा आहे. याच जंगलात राष्ट्रीय प्राणी शेखरू याचे प्रजनन वाढत असून माथेरानकरांसह पर्यटकांना देखील शेखरू हा प्राणी अगदी सहज नजरेने आपल्या डोळ्यासमोर येथे काही ठराविक परिसरात पहावयास मिळत आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान, या नावातच समृद्ध जंगल असे अधोरेखित आहे. माथेरानमध्ये सातशे हेक्टरवर जंगल विस्तारित आहे. त्या पैकी चारशे हेक्टर हे टापू खालील परिसरात आहे. तर तीनशे हेक्टर जंगल हे माथ्यावरील रान म्हणून ओळखले जाते. माथेरानमधील तीनशे हेक्टर परिसर हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. याच हिरवाईमुळे दिवसेंदिवस पर्यटकांची पाऊले माथेरानकडे वळताना दिसतात. या जंगल परिसरात अनेक पक्षी व जंगली प्राण्यांचे वास्तव्य देखील आहे. या संपूर्ण जंगलाचे संरक्षण येथील वनविभागामार्फत केले जाते. त्यामुळे या जंगलात शिकारीसाठी मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे या जंगल परिसरात भटकंती करताना अनेक प्राणी ज्या मध्ये माकडे, वानर, रान डुक्कर, मुंगूस,भेकर, रानमांजर, ससे, घोरपड, खारूताई आणि आपला राष्ट्रीय प्राणी शेखरू हे अगदी सर्रास पणे नजरेस पडतात.

यातच शेखरू हा प्राणी तर आत्ता सर्वत्रच अगदी सहज नजरेने आपल्या डोळ्यासमोर पहावयास मिळत आहे. त्यामुळे माथेरानच्या नागरिकांबरोबर येणार्‍या पर्यटकांना देखील याचे कुतूहल असून आकर्षण निर्माण होत आहे. पुढील नाताळ हंगामात पर्यटकांना हि पर्वणीच असणार आहे. हा इतका लाजाळू प्राणी असून देखील इतक्या सहजपणे लोकांच्या नजरेस पडत आहे. त्यामुळे माथेरानमध्ये आपला राष्ट्रीय प्राणी शेखरू उदंड झाल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

आमचे घर हे वनविभागाच्या कार्यालयासमोर आहे. या परिसरात मोठ मोठी उंचच्या उंच झाडे आहेत. याच झाडांवर शेखरू अगदी सहजरित्या वावरत असतात. खाण्याच्या शोधात ते जमिनीवर हिंडताना दिसतात. त्यांची घरे उंच झाडाच्या शेंड्याला असतात.

संतोष चव्हाण
स्थानिक व्यावसायिक
Exit mobile version