पर्यायी मार्गांचा वापर करण्याची वेळ
| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मेन लाईनवरील शेलू रेल्वे स्थानकाबाहेर वांगणीकडे जाणाऱ्या रेल्वे फाटकाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे 1 ते 9 ऑक्टोबरदरम्यान हे फाटक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. परिणामी स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे.
वांगणी आणि शेलू स्थानकादरम्यान असलेले गेट क्रमांक 19 दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आले आहे. रेल्वे रुळांखालील जुनी खडी काढून नवीन खडी टाकण्यासह अन्य अभियांत्रिकी कामे या ठिकाणी सुरू आहेत. सध्या रुळांखालील खडी काढण्यात आल्याने या मार्गावरून पायी जाणेही कठीण झाले आहे. अभियांत्रिकीची बहुतांश कामे रात्रीच्या वेळी केली जात असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
फाटक बंद असल्याने शेलू गावातून नेरळ तसेच कल्याणकडे जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. उल्हास नदीवरील पुलावरून अवसरे मार्गे कळंब-नेरळ रस्त्याचा वापर केला जात आहे. तातडीच्या कामासाठी काही वाहनचालक शेतातील रस्त्यांचा आधार घेत आहेत. मात्र, या मार्गावरील डोणे रेल्वे फाटकाकडे जाताना चिखलामुळे एका वाहनाचे चाक रुतल्याची घटनाही घडली आहे. त्यामुळे शेलू रेल्वे फाटक बंद असल्याने निर्माण झालेली गैरसोय 9 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे.
