मेंढपाल घाटमाथ्यावरुन रायगडात

। सुतारवाडी । वार्ताहर ।
अनेक वर्षापासून हिवाळ्यात घाटमाथ्यावरून मेंढपाल रायगड जिल्ह्यात दाखल होतात. सुमारे पाचशे मेंढ्या, सोबतीला दोन माणसे असतात. या पूर्वी मेंढपाल जेव्हा घाटमाथ्या वरून रायगड जिल्हयात दाखल व्हायचे त्यावेळी त्यांच्या बरोबर मेंढ्यातर असायच्याच परंतू घोडे, घोड्यांच्या पाठीवर कोंबड्यांचे खुराडे कुत्रा हे सुद्धा असायचे. आता मात्र हे दृश्य कमी प्रमाणात पहावयास मिळते. मेंढपाल आला की शेतकरी आवर्जून मेंढ्यांना शेतात रात्रभर बसवून घेतात. त्या बदल्यात त्या मेंढपालाला त्या दिवसाचे जेवण व काही पैसे द्यायचा. कारण मेंढ्या शेतात बसल्याने मेंढ्यांच्या मल मूत्राचा खत म्हणून चांगला उपयोग होतो. सध्या ही प्रथा काही ठिकाणीच राबवतात. मेंढ्याना खाण्यासाठी खास तरतूद करावी लागत नाही. बोरी , बाभळीचे काटे तसेच काही अंशी शेतातील हिरवे तण खाऊन आपली उपजीविका करतात. मेंढ्यापासून मांस, लोकर तसेच मल-मूत्रापासून शेतीसाठी खत या गोष्टी मिळतात. हे मेंढपाल हिवाळ्यात रायगड जिल्ह्यात येतात आणि मे महिन्यात परतीचा प्रवास करतात.

Exit mobile version