। चिरनेर । प्रतिनिधी ।
घाटमाथ्यावरून येणारा धनगर समाज प्रत्येकाच्या परिचयाचा आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैल प्रवास करीत हा धनगर समाज कोकणात येतो. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर तशीच स्थिती या मेंढपाळांची निर्माण झाली आहे. आपल्या सोबत आपली मुले आणि मेंढ्या घेऊन मिळेल तिथे मुक्काम करणे, हे वर्षानुवर्ष चालत असलेले गणित आहे. यामुळे मुलांच्या शिक्षणाची परवड होत आहे.
आपल्या लहान मुलांना घोड्यावर बसवून, रणरणत्या उन्हाची आणि थंडीची तमा न बाळगता, त्यांचा प्रवास मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरूच असतो. मात्र असे असले तरीसुद्धा दरवर्षी मेंढपाळ मोठ्या प्रमाणावर आपला लवाजमा घेऊन, कोकणात दाखल होत असतात. सोबत असतात ती घोडी आणि याच घोड्यांच्या वरती थाटत असतो तो संसार. मिळेल तिथे वस्ती आणि आकाश हेच छप्पर. शेती हेच त्यांचे अंगण. अशा स्थितीमध्ये जीवन जगणारे मेंढपाळ तालु-तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहेत. पाऊस गेला की कोकणात अनेक जण पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात. त्यापैकी असलेला मेंढपाळ हा मिळेल तिथून मार्ग काढत, हा समाज तालुक्यातील बहुतांश भागात मेंढपाळांनी व्यापलेला पहावयास मिळत आहे.
कोकणात पावसाच्या पाण्यावर अनेक प्रकारच्या काटेरी वनस्पती वाढलेल्या असतात. या काटेरी वनस्पतीपासून मेंढ्यांना सकस आहार मिळत असतो. शिवाय या खाद्यामुळे दूध व्यवसाय तेजीत चालतो. सध्या कोकणामध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे हवे तसे खाद्यपदार्थ उपलब्ध होत नाहीत. शिवाय मेंढ्या आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्याचबरोबर पाण्याची आणि वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालली आहे. मेंढ्या घाट माथ्यावरून घेऊन येणे म्हणजे मोठ्या जिकरीचे काम असते. मात्र तसे असले तरी पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या या व्यवसायाला खंड पडू नये, यासाठी मेंढपालन करण्याचा व्यवसाय आम्ही करतो, असे मत एका मेंढपाळ यांनी व्यक्त केले.







