महाड, पोलादपूरपासून कोकण रेल्वे कोणी तोडली?
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
महाड आणि पोलादपूर तालुक्यांमधील अनेक गावांतील शेकडो जमिनींवर महसुली सातबारा उतार्यावर कोकण रेल्वे कॉर्पोरेशनसाठी भूसंपादन करण्यात आल्याचा शेरा आढळून येत असताना, या दोन तालुक्यांपासून कोकण रेल्वे कोणी तोडली, असा सवाल निर्माण झाला आहे. पोलादपूर तालुक्यावर सातत्याने अन्याय होत असताना, महाड शहराजवळूनही कोकण रेल्वे जाऊ नये, अशी मानसिकता राजकीयदृष्ट्या कोणाची होती अथवा कोणी सहजच नडले आणि सारं बिघडलं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, याबाबत अधिक माहिती उपलब्ध होत नाही.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आंबेतमार्गे वळविण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे तत्कालिन बांधकाम राज्यमंत्री बॅ.अंतुले यांचा असताना पेणचे अंध आमदार भाई शेटये यांनी याला विरोध करून कशेडी घाटमार्गे अस्तित्वात असलेल्या महामार्गालाच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा म्हणून काही मोजक्याच कार्यकर्त्यांच्या मदतीने बॅ. अंतुले यांना विरोध केला होता. मात्र, त्यामागील प्रांजळ हेतू पाहून बॅ. अंतुले यांनी सागरी महामार्गाची संकल्पना पुढे आणून कशेडी घाटामार्गेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 सुरू राहील अशी परिस्थिती कायम ठेवली. आता हाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 असा ओळखला जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेली कोकण रेल्वे अचानक माणगाव तालुक्यातून महाड तालुक्यात प्रवेशताच वीर या पहिल्या गावापासून खाडीपट्ट्यातील दासगाव, वामने, सापे, करंजाडी भागातून थेट रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे पुन्हा दिवाणखवटी गावाजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर स्टेशनवर पोहोचत आहे. यामुळे महाड तालुक्यातील करंजाडी रेल्वे स्टेशन हे वीरनंतरचे दुसरे रेल्वे स्टेशन म्हणून रेल्वेगाड्यांच्या थांब्यासाठी उपलब्ध होत असताना, अलीकडेच सापे वामने येथे नव्याने रेल्वे स्टेशन सुरू होऊन महाड शहर आणि महाड औद्योगिक वसाहत रेल्वे स्टेशनपासून दुरावली आहे. मात्र, यामुळे संपूर्ण पोलादपूर तालुका कोकण रेल्वे स्टेशनपासून दुरावला असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्टेशनच्या पुढे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या शेतजमीन रेल्वेसाठी भूसंपादित झाली नसली तरी पोलादपूर तालुक्यातील पार्ले, लोहारे येथून पोलादपूर शहरातील गोवळकोंडपर्यंतच्या अनेक शेतकर्यांच्या शेकडो एकर जमिनींच्या महसुली सातबारावर कोकण रेल्वे कॉर्पोरेशनसाठी संपादित असा शेरा मारलेला दिसून येत असल्याने पोलादपूर तालुक्यापासून कोकण रेल्वे कोणी तोडली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.







