पारंपरिक वेशभूषा व वाद्यांचा संगम
। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड परिसरात होळी मोठ्या उत्साहात साजरे झाली. हवामान विभागाने वादळी वारा असल्याचे सांगितल्याने पोलीस सतर्क होते. पोलिसांनी प्रत्यक्ष होळीवर जाऊन ग्रामस्थांना आवाहन केले. वारा असल्याने होळी पेटवल्यावर आग इतरत्र पसरणार नाही. याची काळजी घ्या व सुरक्षित होळी खेळा, अशा सूचना केल्या.
मुरुड कोळीवाड्यात पारंपरिक वेशात वाद्याच्या तालात होलिका मातेचे विधिवत पूजन करून रात्री 12 वाजता होलिका दहन आनंदात पार पडले. होळी पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी येते. पूर्वी होळी-रंगपंचमीनंतर उन्हाळ्याला सुरुवात झाली असे म्हटले जाते.
मुरुड तालुक्यात होळीचे थोडे वेगळे रूप पाहायला मिळते. होळी (शिमगा) सण प्रामुख्याने कोळी समाजात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुरुडच्या प्रथेनुसार 15 दिवस अगोदर होळीला होळीच्या माळावर छोटी होळीसाठी खड्डा खणून त्यात रात्री सुपारीचे झाड होळीत जाळले जाते. लहान मोठे सर्वच होळीच्या सणात सामील होतात. ढोल-ताशा वाजवत नाचत दिवस संपतो.
दिवसभरात सुपारीचे झाड वाजत गाजत बाजार आणले, बाजारात सुपारीचे झाड वाद्याच्या तालावर उंच उडवण्याची स्पर्धा लागते. 1 झाडासोबत 25 हौशी मुले असतात. हा खेळ बाजारात विविध ठिकाणहून आलेल्या म्हणजे आगरदांडा, खारआंबोळी, उंडरगाव, डोंगरी अशा गावच्या होळीच्या काठ्या येऊन हवेत उंच उडवतात. हे पाहण्यासाठी मुरुडकर मोठ्या संख्येने बाजारात जमतात, विशेष म्हणजे विदेशी पर्यटक याचे चित्रण करण्यासाठी खास मुरुडला भेट देतात.
शिमगा सणाचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे कोळीवाड्यातील होळी दहन रात्री 12 वाजता कोळीवाडे विद्युत रोषणाईने सजतात. प्रत्यक्ष घरातील महिला कोळी पारंपरिक एक रंगाचा वेष परिधान करून होळीच्या पटांगणात होळीभोवती ढोल ताशांच्या तालात फेर धरतात. होळी म्हणजे सुपारीला होलिकामातेचे रूप दिले जाते. कोळी व इतर समाजाच्या महिला होलिका मातेचे पूजन करतात आणि नवस बोलतात अशी परंपरा आहे. पूजन झाल्यावर संपूर्ण समाज एकत्र येऊन मंत्र उचारात होळी पेटवली जाते. होळी पूर्ण विझेपर्यंत भोवती नाचकाम सुरु असते.