मुरुडमध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

मुरुड परिसरात सोमवारी (दि.2) शिमगोत्सव तथा होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील बाजारपेठेतील सुपारीचे झाड उंचच उंच उडविण्याची स्पर्धा स्थानिकांसह पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरली. तसेच, कोळीवाड्यात पारंपरिक वेशात व वाद्याच्या तालात होलिका मातेचे विधिवत पूजन करून रात्री 12 वाजताच्या सुमारास होलिका दहन पार पडले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुरुड तालुक्यात होळीचे थोडे वेगळे रूप पाहायला मिळाले. मुरुडच्या प्रथेनुसार मुख्य होळीच्या 15 दिवस अगोदर पासून होळीच्या माळावर छोटी होळीसाठी खड्डा खणून त्यात रात्रीच्या सुमारास सुपारीचे झाड होळीत जाळले जाते. मुख्य होळीच्या दिवशी सोमवारी ढोल ताशाचा गजरात होळीचे सुपारीचे झाड मुख्य बाजारपेठेत आणले गेले. त्याचवेळी ते सुपारीचे झाड वाद्याच्या तालावर ऊंच उडण्याची स्पर्धा रंगली. त्यात एका झाडासोबत साधारण 25 हौशी मुलांचा सहभाग होता. हा खेळ खेळण्यासाठी आगरदांडा, खरआंबोळी, उंडरगाव, डोंगरी या गावातील तुरूण मंडळी आली आणि त्यांच्यात सुपारीचे झाड उंच उडविण्याची स्पर्धा लागली. हे पाहण्यासाठी मुरुडकर मोठ्या संख्येने बाजारात जमा झाले होते. विशेष म्हणजे विदेशी पर्यटक मुरूडमधील या होळीचे चित्रण करण्यासाठी खास भेट देत असतात.

तसेच, शिमगा सणाचा सर्वात महत्वाचा टप्पा कोळीवाड्यातील होळी दहन हा होय. यावेळी मुरूडमधील कोळीवाडे विद्युत रोषणाईने सजले होते. परंपरागत येथील होळीच्या सुपारीच्या झाडाला होलिका मातेचे स्वरूप देऊन तिची कोळी व इतर समाजाच्या महिलांनी पूजन करून तिच्याकडे नवस बोलण्यात आला. यावेळी प्रत्येक घरातील महिलेने कोळी पारंपारिक वेष परिधान करून ढोल ताश्याच्या तालात होळीच्या पटांगणात होळी भोवती फेर धरला. पूजन झाल्यावर संपूर्ण समाज एकत्र येऊन मंत्र उच्चारत होळी दहन करण्यात आली. ही होळी पूर्ण विजेपर्यंत त्या भोवती महिलांचे नाचकाम सुरु होते.

Exit mobile version