| तळा | वार्ताहर |
कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा सण समजला जाणाऱ्या शिमगोत्सवास गुरुवारपासून तळ्यात सुरुवात झाली. शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी कोकणात आपल्या गावी परततात. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, महाड, तळा, माणगाव या तालुक्यात शिमगा म्हणजे जणूकाही दिवाळी दसऱ्या सारखा भासतो. शिंमग्याचे पुढील दहा दिवस होळ्या, ग्रामदेवतेच्या पालखीची लगबग, दर्शनासाठी झुंबड, शंखासुराचा मार, गोमुचा नाच, शिमग्याची सोंग जणूकाही आनंदाची पर्वणीच. त्या अनुषंगाने तळा तालुक्यात सर्वत्र होळीच्या मैदानावर प्रथम होळी (पहिला पिला) लावण्यात आला. सकाळपासूनच होळीसाठी बच्चे कंपनीची लगबग सुरू झाली होती. जंगलात जाऊन झाडाच्या फांद्या आणणे, होळी रचणे, गावातून हाळकुंड मागून आणणे आशा अनेक कामांतून लहानमुलांचा उत्साह दिसून येत होता. शिमगोत्सवात मोबाईलमध्ये गुंतलेली मुले होळीसाठी एकत्र येत असल्याचे चित्र पाहायला मिळते.