| माणगाव | प्रतिनिधी |
परंपरा जपणारा व आनंद देणार्या शिमगोत्सवाला शुक्रवारी (दि.24) सुरूवात झाली आहे. पारंपरिक वैशिष्ट्य असलेल्या शिमगोत्सवाचा आनंद, उत्साह व सर्व गावातून दिसत असून, आगळावेगळा असा हा उत्सव आबालवृद्धांच्या आनंदी उत्साहाने सुरू झाला आहे.
अत्यंत उत्साहात साजरा होणारा हा उत्सव आबालवृद्धांचे आकर्षण असते. पौर्णिमेच्या अगोदरच नऊ दिवसांपासून गावोगावी पिले लावण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी सोमवार, दि. 6 मार्च रोजी होलिकोत्सव आहे. या उत्सवाला छोट्या होळीने सुरूवात झाली आहे. पारंपरिकतेनुसार या छोट्या होळीची परंपरा जपली जाते. यावेळी लहान मुले, ज्येष्ठ मंडळी ग्रामदेवतेला साकडे घालून लहान होळीने सुरुवात करतात. सतत नऊ दिवस विविध प्रकारे लहान होळीचा आनंद घेतला जाणार आहे.

होलिकोत्सवात्सवानिमित्त जिल्हाभरात पारंपरिक प्रथांचे प्रदर्शन गावोगावी होते. ढोलकी घुंगराच्या तालावर नृत्य प्रकार सादर करण्यात येते. लहान मुले, मुली, तरुण चित्रविचित्र वेशभूषा, मुखवटे घालून घरोघरी जाऊन मनोरंजनात्मक कला सादर करतात. लहानांसह आबालवृद्ध या मनोरंजनात सहभागी होतात. होलिकोत्सवातील पोस्त परंपरा गावोगावी कायम असून, यानिमित्ताने अनेक गावातून सामूहिक भोजनाचा आनंद ग्रामस्थ घेतात. आपापसातील वाद, मतभेद मिटवित ग्रामस्थ पोस्तमध्ये सहभागी होतात. गावोगावी विविध स्पर्धा, धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे यानिमित्ताने आयोजन करण्यात येते. शिमगोत्सवाला चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गावोगावी उपस्थिती असते.
रंगपंचमीच्या दिनी या होलिकोत्सवाची सांगता होऊन पालखी सोहळ्यात देव आपापल्या स्थानी नेण्यात येतात. होळीला जलार्पण करून होलिकोत्सवाची सांगता होते. आगळ्या वेगळ्या प्रथेचे वैविध्य असलेला हा उत्सव कोकणातील पारंपरिकता जपणारा असा उत्सव आहे. तमाशा, खेळे, डेरे, टिपरी नृत्य, लहान मुले, मुली यांचे सामूहिक खोटे-खोटे वधू वर, नृत्य यांचे विविध प्रकार घरोघरी जाऊन सादर केले जातात. यातून पारंपरिकता जपली जात असून, सामाजिक समतेचा व सद्भावचा असा शिमगोत्सव सर्वत्र सुरू झाला आहे.