| मुंबई | प्रतिनिधी |
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून शिंदे गटात फक्त संभाव्य नावांचीच चर्चा आहे. भाजपाने हा मतदारसंघ शिंदे गटाला सोडला आहे, मात्र शिंदे गटाचा उमेदवार अद्याप ठरत नाही. आ. यामिनी जाधव यांचे नाव पुढे आले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, खा. मिलिंद देवरा, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मनसेचे बाळा नांदगावकर यांची नावे आता मागे पडली आहेत. या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. यापूर्वी त्यांच्या पती यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्या नावाला पसंती मिळाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून या नावांची चर्चा सुरू असून उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही.
उमेदवारी जाहीर झाली नसली तरी या मतदारसंघात भाजपाचे राहुल नार्वेकर यांनी गाठीभेटी आणि बैठका सुरू ठेवल्या आहेत. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचेही गाठीभेटींचे सत्र सुरू आहे. मनसेचे बाळा नांदगावकर यांनीही शिवडी भागात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा होती. आता यामिनी जाधव यांचे नाव चर्चेत आले आहे. यामिनी जाधव या शिवसेनेच्या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यामुळे फक्त नावांचीच चर्चा आहे. महायुतीचा उमेदवार अद्यापही येथे ठरत नाही. मात्र यशवंत जाधव यांनीही या मतदारसंघात आपला प्रचार सुरू ठेवला असल्याचे दिसते.
ठाकरे गटाचे आव्हान या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली असून त्यांनी या मतदारसंघात आपला प्रचार जोरदार चालू केला आहे. गाठीभेटींचा धडाका सुरू आहे. त्यांच्यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही जोरदार प्रचार यंत्रणा या मतदारसंघात राबविली आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघात ताकद लावली आहे.