शिंदे सरकारचा पुन्हा एकदा आनंद शिधा

| मुंबई | प्रतिनिधी |

गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी एकनाथ शिंदे होते. याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधा जिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता आली.

Exit mobile version