भाजप पदाधिकार्यांनी केला आरोप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
वरंडे येथील मालकीच्या जागेत अनधिकृत प्रवेश करून काठीने मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत शिंदे गटाच्या दबावाने भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या दबावामुळेच प्रकार घडल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्याकडून केला जात आहे.
भाजप आणि शिंदे गटामध्ये देशात व राज्यात गुण्यागोविदांनी संसार चालू असताना, रायगड जिल्ह्यात मात्र विशेष करून अलिबाग तालुक्यात शिंदे गटाविरूध्द भाजप यांच्यामध्ये शक्ती प्रदर्शन सुरु असल्याचे समोर आले आहे. अलिबाग तालुक्यातील वरंडे येथे मुंबई येथील एका धनदांडग्याची जागा आहे. गट नं. 326, 366 व 371 या जागेभोवती त्यांनी संरक्षक भिंतीचे काम सुुरू केले होते. दरम्यान, भाजपचे कार्यकर्ते यांनी गुरुवारी (दि.6) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जाऊन तेथील कंत्राटदार व कामगारांना काठीने मारहाण करण्याची धमकी देऊन कामबंद पाडले, असा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्या जागेवर गेलो होतो. शिंदे गटाने पोलिसांवर दबाव टाकत गुन्ह्यात मला अडकविले आहे, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्याने केला. भाजपला दाबण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अलिबाग तालुक्यात शिंदे गटाविरुध्द भाजप हा वाद विकोपाला पोहचण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी स्वतः भाजपच्या पदाधिकार्यांनी रेवदंडा पोलीस ठाणे गाठले. मात्र शिंदे गटाच्या दबावापुढे त्यांचेही काहीच चालले नाही. शिंदे गटातील लोकप्रतिनिधींकडून होणार्या या प्रकारामुळे भाजपमध्ये शिंदे गटाविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत.